मुंबई (Mumbai) : जगभरातील १५ शहरांशी मुंबईचे मित्रत्वाचे नाते आहे. या शहरांना 'सिस्टर सिटी' (Sister City) असे संबोधले जाते. मुंबईच्या १५ 'सिस्टर सिटी' संबंधांना सलाम करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) माध्यमातून वांद्रे कलानगर जंक्शन येथे आकर्षक 'सिस्टर सिटी' चौक साकारण्यात येणार आहे. या ठिकाणी भारतासह 'सिस्टर सिटी' शहरांच्या 12 देशांचे झेंडेही लावण्यात येणार आहेत. यासाठी 1 कोटी 63 लाख खर्च येणार असून, सहा महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे.
'सिस्टर सिटी' शहरांशी मुंबईचे सांस्कृतिक, व्यावहारिक संबंध असून, ज्ञानाची देवाणघेवाणही केली जाते. यासाठी मुंबई आणि संबंधित शहरांच्या प्रशासनांमध्ये सामंजस्य करारही झाले आहेत. या पार्श्वभूमीवर या संबंधांचा गौरव करण्यासाठी कलानगर जंक्शन 'सिस्टर सिटी' चौक आकर्षक बनवण्यात येत आहे. यामध्ये चौकात 15 झेंड्यांसह आकर्षक रोषणाई, हिरवाई, मुंबईकर-पर्यटकांना आकर्षक चौक पाहण्याची व्यवस्था असेल. या ठिकाणी धातूच्या भिंतीवर हे झेंडे लावण्यात येतील. आगामी काळात झेंड्यांची संख्या वाढण्याच्या शक्यतेने जादा जागाही सोडण्यात येईल. तसेच जगाची आकर्षक प्रतिकृतीही साकारण्यात येईल. मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी ही माहिती दिली.
पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा नियोजन निधीमधून हा उपक्रम साकारण्यात येत आहे. मुंबईला स्वच्छ-सुंदर बनवण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि पालिकेच्या माध्यमातून अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये वाहतूक बेटे आणि पुलांखाली मोकळ्या जागांना पर्यावरणाच्या दृष्टीने आकर्षक बनवण्यात येत असून, अनेक सुविधाही निर्माण करण्यात येत आहेत.
या आहेत मुंबईच्या 'सिस्टर सिटी'
- बर्लिन, जर्मनी
- लॉस एंजलिस, यूएसए
- सेंट पीटर्सबर्ग, रशिया
- स्टुटगार्ट, जर्मनी
- योकोहामा, जपान
- होनोलुलू, हवाई
- न्यूयॉर्क, यूएसए
- झाग्रेब, क्रोएशिया
- बार्सिलोना, स्पेन
- बुसान, दक्षिण कोरिया
- पोर्ट ऑफ ओडेसा, युक्रेन
- जकार्ता, इंडोनेशिया
- नाडी, फिजी
- अंतनानारिओ, मादागास्कर
- शांघाय, चीन