मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेत झालेला स्ट्रीट फर्निचर घोटाळा उघड केल्यानंतर संबंधित कंत्राट थांबवण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी या घोटाळ्याच्या चौकशीची घोषणा केली. मात्र हा घोटाळा उघड होऊन चार महिने झाले तरी अद्याप या कंत्राटदारावर कारवाई करण्यात आलेली नाही. 263 कोटींच्या स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याच्या चौकशीची स्थिती काय आहे, चौकशी पूर्ण झाली का, करार रद्द झाला का, असे सवाल युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांना पत्राद्वारे विचारले आहेत.
मुंबई महापालिका आयुक्तांनी स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी सहपालिका आयुक्तांच्या (दक्षता) अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली, मात्र या चौकशी समितीच्या अध्यक्षांचीच बदली करण्यात आली आहे. ही बदली आहे की, त्या अधिकाऱ्याची उचलबांगडी करण्यात आली, असा संशय आता व्यक्त केला जात आहे. मग समितीला अध्यक्ष नसताना आता ही चौकशी कशी आणि कोण करणार, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. कंत्राटदाराला 263 कोटींच्या वस्तू खरेदी करायच्या होत्या. त्यापैकी महापालिकेने रखडलेल्या कराराचा भाग म्हणून 22 कोटींचे स्ट्रीट फर्निचर आधीच खरेदी केले आहे. त्याचबरोबर काम आणि पेमेंट थांबवण्याचे आदेश असूनही 13 शेड्यूल वस्तूंपैकी काही वस्तू महापालिका अजूनही खरेदी करत आहे. ही मुंबईकरांची उघडपणे लूट आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.
आदित्य ठाकरे यांचे सवाल!
या प्रकल्पाचे प्रभारी असलेल्या पालिका उपायुक्तांची विभागीय चौकशी सुरू केली आहे का? यादीतील नॉन-शेडय़ुल वस्तूंसाठी किंमत ठरवणाऱ्या नगररचनाकारांविरुद्ध महापालिकेने चौकशी सुरू केली आहे का? चौकशी सुरू झाली नसेल तर त्याची काय कारणे आहेत? चौकशी समितीच्या अध्यक्षांची बदली करून पारदर्शकतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्याचबरोबर सार्वजनिक खरेदीचे नियम डावलले जात आहेत, अशी विचारणा आदित्य ठाकरे यांनी केली आहे.