Aditya Thackeray Tendernama
मुंबई

Mumbai : स्ट्रीट फर्निचर टेंडरचे 'भूत'; आदित्य ठाकरेंचे BMC आयुक्तांना पुन्हा पत्र

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेतील स्ट्रीट फर्निचर घोटाळा आपण उघड केल्यामुळे सरकारने हे टेंडर रद्द केले असले तरी या घोटाळ्याच्या चौकशीचे नेमके काय झाले, भ्रष्टाचारी कंत्राटदाराला आतापर्यंत किती निधी दिला, असा प्रश्न शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांना पत्र दिले असून घोटाळ्याच्या चौकशीबाबत सवाल केले आहेत. आधीच्या पत्राला उत्तर मिळालेलं नसल्याचा उल्लेखही त्यांनी या पत्रात केला आहे. आदित्य ठाकरे आपल्या पत्रात लिहितात की, मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेला स्ट्रीट फर्निचर घोटाळा या संदर्भात मी आपणांस पत्राद्वारे काही प्रश्न उपस्थित केले होते, त्या प्रश्नांचे उत्तर अद्यापही मला तुमच्याकडून मिळालेले नाहीत, मी या पत्राद्वारे तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो की, स्ट्रीट फर्निचर घोटाळाच्या चौकशीची प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे?, आतापर्यंत कोणाकोणाची चौकशी करण्यात आली आहे?, आतापर्यंत या भ्रष्ट्राचारी काँट्रॅक्टरना किती निधी वितरित झाला आहे व अजून किती निधी वितरित होणार आहे?, या चौकशीचा अहवाल कधी पर्यंत येणार आहे?, आमदार या नात्याने मला संविधानाने दिलेला अधिकार आहे हे सत्य जाणून घेण्याचा. उत्तर आपल्याकडून वेळेत अपेक्षित आहे, असं आदित्य ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.

मुंबई महापालिकेच्या स्ट्रीट फर्निचर प्रकल्पात 263 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करीत आदित्य ठाकरे यांनी या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली होती. 1 जुलै रोजी शिवसेनेने महापालिकेवर काढलेल्या प्रचंड मोर्चाप्रसंगीही याबाबत त्यांनी महापालिकेला जाब विचारला होता. यानंतर नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकारने हे टेंडर रद्द करीत असल्याची घोषणा केली होती. मात्र टेंडर रद्द केले की स्थगित केले, याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करीत राज्यपाल रमेश बैस यांना पत्रही दिले होते. सखोल चौकशी झाल्यास राज्य सरकार उघडे पडेल यामुळेच हे टेंडर रद्द करण्यात आल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला होता. दरम्यान, या घोटाळ्याच्या चौकशीचे काय झाले, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी पुन्हा आयुक्तांना पत्र देऊन उपस्थित केला आहे.