Aditya Thackeray Tendernama
मुंबई

Mumbai : स्ट्रीट फर्निचर टेंडर घोटाळ्याप्रश्नी आदित्य ठाकरेंचा आयुक्तांना इशारा; नाईलाजाने...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) स्ट्रीट फर्निचर कामाअंतर्गत झालेला घोटाळा बाहेर काढला आहे. या घोटाळ्याची महापालिका अधिकाऱ्यांमार्फत अंतर्गत किंवा बाह्य संस्थेच्या मार्फत कायदेशीर चौकशी करणार? या संबंधित उपायुक्त यांचीही चौकशी होणार आहे का? तसेच, या प्रस्तावावर जर तुम्ही सही केली असेल तर तुम्हीही चौकशीचा भाग असणार आहात का? याबाबत योग्य ती थेट उत्तरे देण्यात यावीत. अन्यथा नाईलाजाने विधानसभेच्या विशेषाधिकाराचा वापर करावा, लागेल असा इशारा माजी मंत्री व आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांना दिला आहे.

आदित्य ठाकरे यांनी आयुक्त चहल यांना नुकतेच याबाबतीत पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी मुंबई महापालिकेच्या स्ट्रीट फर्निचर कामाच्या अंतर्गत घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. तसेच, त्यामध्ये कामातील घोटाळ्याबाबत काही प्रमुख प्रश्न विचारले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने स्ट्रीट फर्निचरमध्ये झालेला घोटाळा मी जनतेसमोर आणला आहे. मुंबईकरांनी देखील यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मी या पत्राद्वारे तुम्हाला काही प्रश्न उपस्थित करू इच्छितो. त्याची आपण थेट उत्तरे द्यावीत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. मला तुमच्याकडून थेट उत्तराची आशा आहे. ते न मिळाल्यास राज्याच्या हितासाठी, मला महाराष्ट्र विधानसभेच्या विशेषाधिकाराचा वापर करावा लागेल, असा इशाराही त्यांनी महापालिका आयुक्त चहल यांना दिला आहे.

आदित्य ठाकरे यांचे आयुक्तांना प्रश्न -
1) स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याच्या तपासाची पद्धत काय आहे?, तसेच महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अंतर्गत तपासणी करण्यात येणार की, बाहेरील संस्थेकडून किंवा कायदेशीर तपासणी करण्यात येणार आहे?.
2) संबंधित उपायुक्त ज्यांच्या माध्यमातून ही टेंडर प्रक्रिया सुरू झाली आणि जे अजूनही आम्हाला उत्तर देत आहेत, त्यांची विभागीय चौकशी होणार आहे का?,
3) ज्यांनी दरांबाबत बाह्य माहिती दिली आहे. (आम्हाला दिलेल्या उत्तरात नमूद केल्याप्रमाणे शहरी नियोजक आणि डिझाइनर), ते या तपासणीचा भाग असतील का?
4) समितीचा एक भाग म्हणून, सहाय्यक आयुक्त या तपासाचा भाग असतील का?
5) मला आधीच्या पत्रात उत्तर मिळाल्याप्रमाणे, सर्व दर कॉम्पिटिटिव्ह अथॉरिटी ने ठरवले होते, म्हणजे आपण का ?
6) आपण जर या फाईलवर सही केली असेल, तर आपण देखील या चौकशीला सामोरे जाणार का ? असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी पत्रातून उपस्थित केले आहेत.