Aditya Thackeray Tendernama
मुंबई

Aditya Thackeray : मुंबईतील रस्त्यांसाठी पुन्हा एकदा 6 हजार कोटींच्या टेंडरचा घाट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : राज्य सरकारकडून कंत्राटदार मित्रांसाठी मुंबईकरांच्या पैशांची लूट चालली असून रस्त्यांसाठी पुन्हा एकदा सहा हजार कोटींच्या टेंडरचा घाट घातला जात असल्याचा आरोप युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे.

हा घोटाळा आम्ही उघड करणारच आहोत, पण त्यापूर्वी आधीच्या 6 हजार 80 कोटींच्या घोटाळ्याचे काय झाले, घोटाळेबाजांवर काय कारवाई केली ते सांगा, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी समाज माध्यमातून मुंबई महापालिकेतील नव्या रस्ते टेंडर प्रक्रियेचा पर्दाफाश केला आहे. महापालिका आता 6 हजार कोटींच्याही वर जाऊन अधिकच्या खर्चासाठी टेंडर काढणार आहे. मात्र आम्ही आणखी एक घोटाळा उघड करण्यापूर्वी आधीच्या घोटाळ्यातील दोषींवर काय कारवाई केली हे महापालिकेने स्पष्ट करावे, असे आदित्य यांनी नमूद केले आहे. 2023-24च्या रस्त्यांची खरी स्थिती काय, हे महापालिकेने स्पष्ट करावे, असे आवाहन करतानाच विद्यमान सत्ताधारी कंत्राटदार मित्रांसाठी बीएमसीतील मुंबईकर करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी करू शकत नाही, असेही ठणकावले आहे.

गेल्या 2 वर्षांपासून बीएमसी थेट घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि त्यांच्या नगरविकास खात्याकडून चालवली जात आहे. मुंबईचे 100 कोटी रुपये रेसकोर्सवरील खासगी मालकीच्या घोड्यांच्या तबेल्यांवर खर्च करण्याच्या मूर्खपणाला बीएमसीने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री मुंबईकडे फक्त पैसे काढण्याचे 'एटीएम' म्हणून पाहतात. पण आमच्यासाठी आमची मुंबई आई आहे, जिच्या सेवेसाठी झगडणे आमच्या रक्तातच आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

नेमके प्रकरण काय आहे?
राज्य सरकारने महापालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करीत शहरातील सर्व रस्ते एकाच वेळी सिमेंट काँक्रिटचे करण्याचा घाट घातल्यामुळे कंत्राटदार प्रतिसाद देत नसल्याने गेल्या सवा वर्षात चौथ्यांदा टेंडर मागवण्याची वेळ आली आहे. यातच सरकारच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांच्या फायद्यासाठी प्रशासकाच्या माध्यमातून रस्ते कामात होणारा घोटाळा आदित्य ठाकरे यांनी उघड केला होता. त्यामुळे टेंडर रद्द करण्यात आले. यानंतर शहरातील रस्ते कामासाठी तब्बल 300 कोटी कमी दराने टेंडर काढण्यात आले होते.

आदित्य ठाकरे यांचे सवाल!
6080 कोटींचा घोटाळा आम्ही उघड केल्यानंतर 2022मध्ये महापालिकेने रस्ते कामाची टेंडर रद्द केली. मात्र ज्या कंत्राटदारांनी कामाला विलंब केला, काम सुरू केले नाही त्यांच्यावर काय कारवाई केली? या घोटाळ्यातील आणि त्यापूर्वीच्या काळ्या यादीतील कंत्राटदारांचे काय झाले?

जानेवारी 2023च्या टेंडरची रक्कम आणि जाहीर केलेली आगाऊ रक्कम कंत्राटदारांना अदा केली गेली की नाही? जानेवारी 2023च्या टेंडर घोटाळ्यासाठी कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली का?

लवकरच स्थापन होणारे आमचे सरकार या सर्व कामांना स्थगिती तर देणारच आहे. शिवाय या घोटाळ्यातल्या देयकांचे पैसेही थांबवणार आहे. शिवाय या घोटाळ्यांची पूर्ण आणि निष्पक्ष चौकशी करून दोषी कोणीही असो, त्यांना कडक शिक्षा करण्यात येईल, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.