Aditya Thackeray Tendernama
मुंबई

Aditya Thackeray : पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनासाठी सगळा अट्टाहास; 14 हजार कोटींच्या कामांचे शॉर्ट नोटीस टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : कामांना कोणतीही मंजुरी नसताना, कंत्राटदार नेमला नसताना कोट्यवधीच्या प्रकल्पांच्या घोषणा करायच्या आणि पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटने करून मुंबई आणि महाराष्ट्राची लूट करण्याचा प्रकार राज्य सरकारकडून सुरू असल्याची टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केली.

उद्या (ता.5) देखील पंतप्रधानांच्या हस्ते अशाच प्रकारे 14 हजार कोटींच्या गायमुख-भाईंदर मार्गाचे भूमिपूजन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. साध्या इमारतीचे उद्घाटन करायचे असले तरी सर्व प्रकारच्या परवानग्या आहेत का याची खातरजमा पीएमओ कार्यालयाकडून केल्यानंतरच पंतप्रधान येतात, मात्र आता तसे काही होताना दिसत नाही असे सांगून आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, पंतप्रधानांच्या हस्ते गायमुख-भाईंदर रस्त्याचे भूमिपूजन होणार आहे. मात्र या मार्गासाठी पर्यावरण विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. सॉलिड टेस्ट झालीय का? जिओ टेक्निकल सर्व्हे झालाय का? असे सवाल उपस्थित केले. पंतप्रधानांच्या उपस्थितीत दोन वर्षांपूर्वी सहा हजार कोटींच्या सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यांचे भूमिपूजन झाले. यातील फक्त नऊ टक्केच कामे पूर्ण झाल्याचे माहिती समोर आली आहे. मुंबईत अजूनही जागोजागी खड्डेच खड्डे दिसत आहेत. त्यामुळे अशा प्रकारे अर्धवट कामांचे भूमिपूजन, उद्घाटने करण्याची घाई का करता, अशी विचारणा त्यांनी केली. तसेच मुंबईसह ठाणे, नाशिक, नागपूर, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हीच स्थिती असल्याचे ते म्हणाले. ही कामे का झाली नाहीत याची चौकशी करा, अशी मागणीही त्यांनी केली.

गायमुख ते भाईंदर या मार्गासाठी 13 सप्टेंबर रोजी 14 हजार कोटींचे टनेल टेंडर काढण्यात आले. हे काम पूर्ण होण्यासाठी किमान तीन ते चार वर्षे लागतील. मात्र इतक्या मोठ्या कामासाठी केवळ 20 दिवसांचे शॉर्ट टेंडर कसे काढले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन करण्यासाठीच हे शॉर्ट नोटीसचे टेंडर काढल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. ठाणे ते बोरिवली टनेलच्या कामासाठी वेस्ट इंडीजच्या बँकेची गॅरंटी कशी काय दिली? या बँकेला आरबीआयने परवानगी दिलीय का? ज्या कामांमध्ये आर्थिक अनियमितता आहे, पंतप्रधानांनी अशा कामांचे भूमिपूजन, उद्घाटन करणे किती योग्य आहे, असा सवालही त्यांनी यावेळी केला. 2017 मध्ये अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामाचे भूमिपूजन झाले, मात्र हे काम सुरूही झाले नाही. फक्त खर्च वाढला. अशी कामे करून सरकारला नक्की काय साधायचे आहे? मेट्रो कामांचे खर्च वाढले, पण कामे पूर्ण झालेली नाहीत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.