Aditya Thackeray Tendernama
मुंबई

Mumbai:महापालिकेतील घोटाळ्यांची लोकायुक्तांमार्फत चौकशी करा: ठाकरे

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेत झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समितीद्वारे चौकशी करण्याचे जाहीर केले आहे. मात्र, महापालिकेत झालेल्या या कोट्यवधींच्या घोटाळ्यांची लोकायुक्तांकडून चौकशी करा, अशी मागणी युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केली.

महापालिकेच्या स्ट्रीट फर्निचर उभारण्याच्या कामात तब्बल 263 कोटींचा घोटाळा झाल्याचे पुराव्यासह उघड केल्यानंतर महापालिकेकडून अद्याप कोणतेही ठोस उत्तर देण्यात आलेले नाही. याशिवाय कोट्यवधींचा खडी घोटाळा, रस्ते घोटाळाही झाला आहे. याबाबत शिवसेनेने 1 जुलै रोजी महापालिकेवर मोर्चा काढून जोरदार निषेध करण्यात आला. मोर्चा काढूनही महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने आदित्य ठाकरे यांनी अधिवेशनात हक्कभंग आणण्याचा इशारा दिला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाच्या महापालिकेत झालेल्या घोटाळ्यांच्या आरोपांची समितीकडून चौकशी करण्याचे घोषित केले. मात्र यावर आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेत लोकयुक्तांकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.

मुंबईतील रस्ते घोटाळा, खडी घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा यावर मुंबईकरांच्यावतीने सातत्याने आवाज उठवल्यावर व मोर्चा निघाल्यावर आता अधिवेशनात कोंडी होईल या भीतीने मुख्यमंत्र्यांना जाग आली आहे. घोटाळ्याची चौकशी करू असे त्यांनी म्हटले आहे. मुंबईकरांचा हा विजय आहेच; मात्र या घोटाळ्यांची लोकायुक्तांद्वारे चौकशी व्हावी. यासंबंधीचे मी मागितलेले अहवाल आणि बैठकांचे इतिवृत्त महापालिकेने दिले पाहिजेत. ते का दिले जात नाहीत? त्यात काही लपवण्यासारखे आहे का, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

या प्रश्नांची उत्तरे द्या :
- खरेदीचे टेंडर रस्ते विभागाकडून न काढता 'सीपीडी' विभागाकडून का काढण्यात आली?
- कंत्राटदाराकडून पुरवण्यात येणाऱ्या प्रत्येक वस्तूची बाजारभावानुसार किंमत किती आहे?
- महापालिकेला आवश्यक असणाऱ्या सर्व 13 वस्तूंची खरेदी करणे एकाच कंत्राटदाराला का आवश्यक आहे?
- खरेदीद्वारे कोणत्या आणि किती प्रमाणात वस्तू मागवण्यात आल्या आहेत, त्यांचा दर्जा-किंमत काय?
- 'सीपीडी'मध्ये बदली होऊनही ही टेंडर केवळ एका विशिष्ट अधिकाऱ्याला कार्यान्वित करण्यासाठी का देण्यात आली?