मुंबई (Mumbai) : नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Mahamarg) दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर (नाशिक) येत्या शुक्रवारी (ता.26) रोजी खुला होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
मुंबई ते नागपूर या महत्वाकांक्षी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे (नागपूर शिर्डी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर आता शिर्डी ते नाशिक या दुसऱ्या टप्प्यापर्यंतचा मार्ग खुला होणार आहे. या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर नागपूरहून नाशिकपर्यंतचे अंतर केवळ सहा तासात कापता येणार आहे. मुंबई ते नागपूर या 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील नाशिकमधील भरवीर पर्यंतचे काम पूर्ण झाले असून येत्या शुक्रवारी (26 मे) शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. हा टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर शिर्डी ते भरवीर अंतर अवघ्या 40 ते 45 मिनिटांत पार करता येणार आहे.
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा 701 किमी अंतराचा आहे. त्यापैकी नागपूर ते शिर्डी असा 501 किमीचा टप्पा सुरू झाला आहे. शिर्डी ते भरवीर पर्यंतचे 80 किमी महामार्गाचे दुसऱ्या टप्प्यातील काम पूर्ण करण्यात आले आहे. भरवीर ते नागपूर अंतर सहा तासात पार करणे शक्य होणार आहे. मुंबई ते भरवीर या उर्वरित 200 किलोमीटरच्या टप्प्याचे काम सध्या सुरू आहे. शिर्डी ते भिवंडी या टप्प्याचे काम अजूनही सुरू आहे. सिन्नर ते कसारा टप्प्यात 12 बोगदे आणि 16 छोटे पूल उभारावे लागणार आहेत. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला केला जाईल. हा टप्पा पूर्ण झाल्यावरच मुंबईकरांना समृद्धी महामार्गाचा पूर्ण लाभ घेता येईल.