Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde Tendernama
मुंबई

Shinde, Fadnavis, Pawar : राज्य सरकारचे आता 'रस्ते विस्तार मिशन'; तब्बल 5 हजार कोटींतून...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) होते. या प्रकल्पावर सुमारे 5 हजार कोटींचा खर्च केला जाणार आहे.

आदिवासी गावे आणि पाड्यांमध्ये रस्त्यांअभावी अनेक दुर्देवी घटना घडतात. या योजनेमुळे मुख्य रस्त्यांशी या वाड्यांचा सातत्याने संपर्क राहील. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व आदिवासी पाडे बारमाही रस्त्याने जोडण्यासाठी नवीन भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजना राबविण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली होती.

या रस्त्यांसाठी आदिवासी विकास विभागाची स्वतंत्र समिती असेल तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग हे रस्ते बांधेल. याअंतर्गत सुमारे 6838 कि.मी. लांबीचे रस्ते बांधण्यात येणार आहेत.

त्यानुसार या योजनेंतर्गत सर्व आदिवासी वाडे/पाडे यांना बारमाही मुख्य रस्त्याशी जोडणे, आदिवासी उपयोजना क्षेत्रातील सर्व आठमाही रस्ते बारमाही करणे आणि आदिवासी उपयोजना क्षेत्रातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र/आश्रमशाळा यांना मुख्य रस्त्याशी जोडण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. या योजनेमुळे आदिवासी जनतेस मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत.