Mumbai Tendernama
मुंबई

'या'मुळे मंदावली शिवडी-नाव्हा शेवा ट्रान्सहार्बर लिंकची गती

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : कोविडमुळे (Covid 19) मंदावलेल्या शिवडी-नाव्हा शेवा ट्रान्स हार्बर लिंकच्या (Shevadi Nhava Sheva Trans Harbour Link) कामाला गती मिळाली असली तरी, पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार डिसेंबर २०२२ मध्ये ट्रान्स हार्बर लिंक पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, आता २०२३ मध्ये हा प्रकल्प आता पूर्ण होईल.

मुंबई पारबंदर प्रकल्प (Mumbai Trans Harbour Link) किंवा शिवडी-न्हावा शेवा पारबंदर मार्ग हा मुंबई महानगर क्षेत्रामधील एक प्रस्तावित प्रकल्प आहे. अरबी समुद्राच्या ठाणे खाडीवर २२ किमी लांबीच्या व भारतातील सर्वात मोठ्या पूलाद्वारे दक्षिण मुंबईमधील शिवडी भाग नवी मुंबईसोबत जोडला जाईल. हा मार्ग मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गासोबत देखील जोडला जाईल ज्यामुळे पुण्याहून दक्षिण मुंबईकडे वाहतूक सुलभ होईल. तसेच प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील दक्षिण मुंबईहून कमी अंतरात गाठता येईल.

मुंबईला रायगड जिल्ह्यासोबत जोडणाऱ्या सागरी मार्गाची संकल्पना सर्वप्रथम १९६३ साली रचली गेली. महाराष्ट्र शासनाने ह्या प्रकल्पामध्ये सुरूवातीस फारसे स्वारस्य न दाखवल्यामुळे व राजकीय रस्सीखेचीमुळे हा प्रकल्प बासनातच राहिला. २०१२ साली केंद्रीय पर्वावरण मंत्रालयाने ह्या प्रकल्पास मंजूरी दिली.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच, मुंबई पारबंदर प्रकल्प. मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच नवी मुंबईतील प्रदेशाचा विकास करण्याच्या दृष्टीने मुंबई पारबंदर प्रकल्पाचा प्रस्ताव विचाराधीन होता. मुंबई व नवी मुंबई यामधील वाहतूक वेगवान व्हावी या हेतूने मुंबई बेटावरील शिवडी ते मुख्य भूमीवरील (नवी मुंबई) न्हावा या दरम्यान पूल बांधण्याचा विचार करण्यात आला होता. शासनाने दि. ४ फेब्रुवारी २००९ च्या शासन निर्णयान्वये या प्रकल्पाची मालकी व अंमलबजावणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) असेल, असे जाहीर केले. त्याचप्रमाणे या प्रकल्पासाठी 'एमएमआरडीए'तर्फे निधी उपलब्ध करण्यात येईल, असेही सांगण्यात आले. मुंबई पारबंदर प्रकल्प हा यापूर्वी रस्ते वाहतूक प्रकल्प म्हणून नियोजित होता. राज्य सरकारने ८ जून २०११च्या शासन निर्णयाद्वारे मुंबई पारबंदर प्रकल्पास प्रादेशिक विकास प्रकल्पाचा दर्जा दिला आहे.

प्रकल्पात मुंबईतील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाऱ्या २२ किमी लांबीच्या सहा पदरी पुलाचा अंतर्भाव आहे. या पुलाची समुद्रातील लांबी १६.५ किमी आहे. या पुलाला मुंबईतील शिवडी व नवी मुंबईताल शिवाजीनगर, राज्य मार्ग-५४ व राष्ट्रीय महामार्ग ४ब वर चिले गावाजवळ आंतरबदल आहेत. या प्रकल्पामुळे नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील प्रदेशाचा विकास होणार असून, त्यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाशी वेगवान दळणवळण शक्य होणार आहे. मुंबई व नवी मुंबई आणि कोकण यांमधील अंतर कमी झाल्यामुळे इंधन व वाहतूक खर्चात बचत होणार आहे.

ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या पाइल, पाइल कॅप, पुलाच्या खांबाचे बांधकाम सध्या सुरू आहे. पुलाचे सेगमेंट बनविण्याचे काम कास्टिंग यार्डमध्ये सुरू आहे. पुलाच्या गाळ्याचे सेगमेंट उभारणीचे काम अणि तात्पुरत्या पूलाचे बांधकामही प्रगतिपथावर आहे. प्रकल्पाची अर्थिक प्रगती ४२ टक्के झाली आहे. प्रकल्पाचा बांधकाम कालावधी साडेचार वर्षे आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पांचे काम आहे. प्रकल्पाला ११,००० कोटी खर्च अपेक्षित आहे.