मुंबई (Mumbai) : पुणे (Pune) ते बंगळूर (Bengaluru) महामार्गावरील सातारा (Satara) ते कागल (Kagal) टप्प्यातील सहापदीकरणाला प्रत्यक्षात तीन महिन्यांत सुरवात होण्याची शक्यता आहे. या कामाच्या दोन्ही टप्प्यांसाठी ४४७९.१५ कोटींचा भांडवली खर्च अपेक्षित आहे. त्यासाठीचे टेंडर जाहीर झाले आहेत. या टेंडरच्या छाननीचे काम सुरू आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून या रस्त्याचे सहापदरीकरण रखडले आहे.
सातारा ते पेठ नाक्यापर्यंतच्या ६१ किलोमीटरच्या पहिला टप्प्यासाठी भांडवली खर्च २१२७.७४ कोटी अपेक्षित आहे. पेठ नाका ते कागलपर्यंतच्या ६७ किलोमीटरचा सहापदीकरणाचा दुसरा टप्पा आहे. त्यासाठी २३५०.४१ कोटींचा भांडवली खर्च अपेक्षित आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्यावर्षी कराडला एका कार्यक्रमात या सहापदरीकरणाची घोषणा केली होती. त्यानुसार प्रत्यक्षात कार्यवाही सुरू झाली आहे.
या महामार्गाच्या सहापदरीकरणात सातारा ते कागल टप्प्यात कॉंक्रिटीकरण व डांबरीकरण संमिश्रपणे होणार आहे. पहिल्या टप्प्याचा वस्तू व सेवा करासह १६७०.८० कोटी इतका खर्च गृहित धरण्यात आला आहे. पहिल्या टप्प्याची लांबी ६१.९४५ किलोमीटर आहे. दुसऱ्या टप्प्यातील वस्तू व सेवा करांसह खर्च १९५९.८५ कोटींपर्यंत अपेक्षित आहे. त्याची लांबी ६७ किलोमीटर इतकी आहे. तोही रस्ता कॉंक्रिटीकरण व डांबरीकरण संमिश्रपणे होणार आहे. दोन्ही टप्प्यांत तब्बल ९० हजार वाहने २४ तासांत धावतात, असे गृहित धरून त्याचा आराखडा तयार केला आहे.
हरियाना येथील गुरगावच्या मेसर्स एलबीजी कंपनीचा तांत्रिक सल्ला घेतला गेला आहे. त्यानुसार दोन्ही टप्प्यांतील सहापदीकरणाचे काम केंद्र शासनाने हाती घेतले आहे. त्या अनुषंगाने बांधा, वापरा व हस्तांतर करा, या तत्त्वावर ही कामे होणार आहेत. त्याची टेंडर ही जाहीर झाली आहेत. या टेंडरची छाननी सुरू आहे. प्रत्यक्षात तीन महिन्यांत काम सुरू होण्याचा अंदाज आहे.