मुंबई (Mumbai) : पनवेलनजीक असलेल्या कळंबोली जंक्शनची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. उर्वरित महाराष्ट्राला जोडणारा कळंबोली सर्कल हा महत्त्वाचा दुवा आहे. या सर्कलच्या विस्तारीकरणाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. या कामावर सुमारे ७७० कोटींचा खर्च होणार आहे. हा १५.५३किलोमीटरचा महत्वपूर्ण पायाभूत प्रकल्प ठरणार आहे. या कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण करून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
कळंबोली सर्कलवर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली ते पनवेल- उरण-जवाहलाल नेहरू बंदराकडे जाणार्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. पनवेल-उरण ते मुंबई-ठाण्याकडून जेएनपीटीच्या दिशेने ये-जा करणारे अवजड कंटेनर, प्रवासी वाहतूक कळंबोली एमजीएम सर्कल येथून मार्गक्रमण करीत असतात, त्यामुळे कळंबोली सर्कल हे ठिकाण रहदारीचे आणि महत्त्वाचे जंक्शन आहे. या ठिकाणी कंटेनर वाहतूक चोवीस तास चालू असतात आणि या कारणास्तव नेहमीच येथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. वाहतूक कोंडीतून प्रवाशांची मार्ग काढण्यासाठी स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विनंती केली होती व त्यासंदर्भात पाठपुरावा केला होता.
या दैनंदिन समस्येवर मार्ग काढून जनतेची वाहतूक खोळंब्यातून सुटका करण्यासाठी सर्व संबंधितांच्या बैठका घेऊन उपाययोजना सूचविण्यात आल्या. तसेच या सर्कलच्या विस्तारीकरणाला नितीन गडकरी यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. या कामासाठी लवकरच टेंडर प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे इंधन आणि वेळेची बचत होणार आहे. उर्वरित महाराष्ट्राला जोडणारा कळंबोली सर्कल हा महत्त्वाचा दुवा आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमाने उड्डाणे घेऊ लागल्यानंतर एअर ट्रॅफिक कमी होणार आहे. मात्र रस्त्यावरील कोंडी वाढू नये, या पार्श्वभूमीवर कळंबोली वाहतूक सर्कल विकसित करणे काळाची गरज होती. विमानतळाच्या सीमाभागातील रस्ते विकसित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामधील पॅकेज चारपर्यंतची कामे पूर्ण झाली आहेत.