Mumbai Trans Harbour Link Tendernama
मुंबई

मुंबईतून नवी मुंबईत पोहचा अवघ्या २० मिनिटांत; लवकरच...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : देशातील सर्वात मोठा सागरी सेतू आलेल्या मुंबई ट्रान्स हार्बरलिंक (Mumbai Trans Harbour Link - एमटीएचएल) या पारबंदर प्रकल्पातील (शिवडी-नाव्हा शेवा सागरीसेतू) आणखी एक महत्त्वाचा टप्पा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पूर्ण केला. या प्रकल्पातील नवी मुंबईच्या दिशेने प्रकल्पाच्या जमिनीवरील मार्गाच्या कामाला वेग देण्यात आला असून, नुकताच येथील शेवटचा ४९ वा स्पॅन यशस्वीपणे बसविण्यात आला. आतापर्यंत प्रकल्पातील ८४ टक्के बांधकाम पूर्ण झाले असून, १७,८०० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प डिसेंबर २०२३ पर्यंत वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे प्रयत्न आहेत. (Mumbai to Navi Mumbai in 20 Mints.)

वेगवान वाहतुकीसाठी मुंबई-नवी मुंबईतील अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड ओळखला जाणार आहे. मुंबई-नवी मुंबई अंतर केवळ २० ते २५ मिनिटांत पार करता यावे यासाठी २२ किमी लांबीचा मुंबई पारबंदर प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यापैकी 16.5 किलोमीटरचा मार्ग समुद्रातून आणि 5.5 किलोमीटर अंतराचा मार्ग जमिनीवरुन जातो. या प्रकल्पाच्या कामास २०१८ मध्ये सुरवात झाली. सुमारे १७,८०० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करून तो वाहतूक सेवेत दाखल करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. आतापर्यंत प्रकल्पाचे ८४ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम वेगात करण्यात येत आहे. या प्रकल्पातील २२ किमी लांबीच्या सागरीसेतूचा २.७ किमीचा भाग नवी मुंबईच्या दिशेने चिरले येथे जमिनीवर आहे. या भागाच्या सर्व खांबांचे काम पूर्ण झाले असून या खांबांवर बसविण्यात येणाऱ्या शेवटच्या ४९ व्या स्पॅनचे काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले.

प्रकल्पाच्या टप्पा-२ मधील एमपी २४५ आणि एमपी २४६ (उजवी बाजू) या क्रमांकांच्या खांबामधील शेवटचा स्पॅन बसविण्यात आला. मुंबईतील शिवडी येथून सुरू झालेला सागरीमार्ग २.७ किमीच्या या जमिनीवरील मार्गावर येऊन संपणार आहे. या भागाचे काम आता पूर्ण होत आहे. स्पॅन बसविण्याचे काम पूर्ण झाल्याने आता त्यावर सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.


...असा आहे मार्ग
1) एमएमआरडीएतर्फे एकूण २१.८ किलोमीटर लांबीच्या, सहा लेनच्या या समुद्री मार्गाचे बांधकाम सुरू आहे. यात १६.५ किलोमीटरचा समुद्रातून जाणारा मार्ग आणि उर्वरित ५.३ किलोमीटरचा रस्ता आहे. यातून मुंबई आणि नवी मुंबई या शहरांना जोडले जाणार आहे.

2) ट्रान्सहार्बर लिंक मार्ग प्रत्यक्षात आल्यास मुंबई आणि नवी मुंबईतील वाहतूक कोंडी दूर होण्याची शक्यता आहे. हा मार्ग मध्य मुंबईत शिवडी, मुंबईच्या खाडीवर शिवाजी नगर आणि नवी मुंबईत राष्ट्रीय महामार्ग ४-बी वरील चिरले येथे जोडला जाईल. यावरून दररोज सुमारे ७० हजार वाहनांची ये-जा होण्याचा अंदाज आहे.