Railway Station Tendernama
मुंबई

Mumbai : हार्बरवरील 'या' 4 रेल्वे स्थानकांचे रुपडे पालटणार; 130 कोटींचे बजेट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मध्य आणि पश्चिम रेल्वे पाठोपाठ आता हार्बर मार्गावरील चार स्थानकांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ या कामावर 130 कोटी खर्च करणार आहे. यात गुरु तेग बहाद्दूर नगर, चेंबूर, गोवंडी आणि मानखुर्द या चार स्थानकांचे नूतनीकरण करण्याची योजना आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत ही टेंडर प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे.

या रेल्वे स्थानकात अतिरिक्त फूट ओव्हर ब्रिजेस, स्कायवॉक, एलिव्हेटेड डेक आणि सर्विस इमारती सुधारण्यात येणार आहेत, असे एमआरव्हीसीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले. तसेच जीटीबी नगर रेल्वे स्थानकावर पश्चिम आणि दक्षिण टोकाला पूर्वी प्रवेशद्वारांना जोडणारा डेक बांधण्यात येणार असून जे रोड ओव्हर ब्रिज आणि प्रस्तावित प्लॅटफॉर्मला जोडले जाणार आहेत. 275 मीटर लांबीचा आणि 10 मीटर रुंदीचा एक नवीन होम प्लॅटफॉर्म पश्चिमेकडे बांधला जाईल आणि या प्लॅटफॉर्म उत्तरेकडे 75 मीटरने वाढवण्यात येईल आणि यात पार्किंग क्षेत्र स्थापित केले जाईल", असेही उदासी यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेच्या घाटकोपर, भांडूप, मुलूंड, डोंबिवली या रेल्वेस्थानकांचा कायापालट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) मुंबई अर्बन ट्रान्स्पोर्ट प्रोजेक्ट एमयूटीपी फेज-3ए प्रकल्पांतर्गत कोट्यवधी रूपये खर्च करणार आहे. याबाबतची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून काम ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार आहे.