मुंबई (Mumbai) : शीव (सायन) रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या 110 वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन रेल्वे पुलावर लवकरच हातोडा पडणार आहे. या जागेवर नवा पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी 50 कोटी खर्च येणार आहे. नव्या पुलाची लांबी सुमारे 51 मीटर, तर रेल्वे ट्रॅकपासून पुलाची उंची सुमारे 5.4 मीटर ठेवली जाणार आहे.
1912मध्ये वाहनांसाठी उभारलेला हा पूल जीर्ण झाला आहे. या पुलावरून दररोज सुमारे दीड लाख वाहने ये-जा करतात. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये. तसेच मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी पुलाखालून जाण्यासाठी जागा उपल्बध व्हावी म्हणून हा पूल तोडून नवा पूल बांधण्यात येणार आहे.
शीव पूल बंद करण्याआधी येथून होणारी वाहतूक कशी वळवायची, पूल काढण्यासाठी रेल्वेला मेगाब्लॉक घ्यावा लागणार आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी गणपतीनंतर रेल्वे आणि वाहतूक विभागाची बैठक होणार असल्याची माहिती रेल्वेच्या उच्चपदस्थांनी दिली. हा पूल तोडताना आणि नवा पूल बांधताना रेल्वे वाहतूक सुरूच राहणार आहे.
सध्याचा पूल सुमारे 35 मीटर रुंदीचा असून त्याखाली दोन गाळे आहेत. त्याच्या एका गाळ्यातून धिम्या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे दोन तर दुसऱ्या गाळ्यात जलद मार्गावरील गाड्यांचे दोन रेल्वे रूळ आहेत. येथे आणखी दोन रूळ टाकण्याचे रेल्वेचे नियोजन असल्याने नव्या पुलाची लांबी सुमारे 51 मीटर असणार आहे, तर रेल्वे ट्रॅकपासून पुलाची उंची जवळपास 5.4 मीटर ठेवली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात रुळाची उंची वाढवणे शक्य होणार आहे.