मुंबई (Mumbai) : सीएसएमटी (CSMT) लोकल रेल्वे स्थानकाजवळच्या हिमालय पुलाचे ओडिशावरून आणलेले 120 टनांचे 5 गर्डर बसवण्याची मोहिम नुकतीच फत्ते झाली आहे. शनिवारी रात्री 3 गर्डर तर रविवारी रात्री उर्वरित 2 गर्डर बसवण्यात आले. त्यावर आता सिमेंटचा स्लॅब टाकण्यात येणार आहे. हे काम पुढील एक ते दीड महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यामुळे हिमालय पूल फेब्रुवारी अखेरपर्यंत प्रवाशांसाठी खुला करण्यासाठी मुंबई महापालिका प्रयत्नशील आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळचा हिमालय पूल 14 मार्च 2019 मध्ये कोसळला. यात सात जणांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले. दुर्घटनेनंतर पूल बांधण्याबाबत मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागाकडून आराखडा तयार करण्यात आला होता. नवीन आराखड्यानुसार हिमालय पूल स्टेनलेस स्टीलचा बांधण्यात येत आहे. पुलासाठी लागणारे स्टेनलेस स्टिलचे गर्डर ओदिशामधून आणण्यात आले असून पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, वृद्ध, दिव्यांग आणि गरोदर महिलांसाठी या पुलाला सरकते जिनेही जोडण्यात येणार आहेत.
लोखंडी पुलाला पावसाळ्यात गंज पकडतो. त्यामुळे मुंबईत नव्याने बांधण्यात येणारे पूल स्टेनलेस स्टीलचे बांधण्यात येत आहेत. हिमालय पूल हाही स्टेनलेस स्टीलचा बांधण्यात येत असून त्यासाठी 5 गर्डर बसवण्यात आले आहेत. एका गर्डरची लांबी 35.211 मीटर आहे. स्टेलनेस स्टिलमुळे पावसाळ्यात गंज पकडण्याचा धोका राहणार नाही. हा पूल 50 वर्षे टिकेल, असा दावा केला जात आहे.