Oxfam Report Tendernama
मुंबई

जगात दारिद्र्य वाढतेय! महागाई उठली लाखोंच्या जीवावर; हे आहे कारण..

टेंडरनामा ब्युरो

दावोस, स्वित्झर्लंड (Davos, Switzerland) : कोरोनाच्या महासाथीने जगभरात एका बाजूला मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली, तर दुसऱ्या बाजूला या संकटाच्या काळात प्रत्येक 30 तासांना एका नव्या अब्जाधीशाला जन्म घातल्याचे धक्कादायक वास्तव एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालातून समोर आले आहे. ज्या वेळाने अब्जाधीशांची संख्या वाढली, त्याच वेगाने आता जगभरातील लाखो नागरिक दारिद्र्याच्या गर्तेत लोटले जाण्याची भीती असल्याचा दावा ब्रिटनस्थित ऑक्सफॅम या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेकडून करण्यात आला आहे.

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेमध्ये ऑक्सफॅमकडून मांडण्यात आलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषदेचे (World Economic Forum) आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी जागतिक स्तरावरील धोरणकर्ते, उद्योजक एकत्र येतात.

‘ऑक्सफॅम’ने म्हटले आहे की, गरिबांच्या मदतीसाठी श्रीमंतांवर कर लावण्याची वेळ आली आहे. यावर्षी २६.३ कोटी लोक दारिद्र्य पातळीच्या खाली आले आहेत. तुलनात्मकरीत्या कोरोनासाथीच्या काळात ५७३ लोक अब्जाधीश बनले आहेत किंवा दर ३० तासाला एक व्यक्ती धनाढ्य बनली आहे. कोरोनाकाळात वाढत्या महागाईमुळे जीवनावश्यक खर्चाचे संकट मोठे होते.

संपत्तीत अविश्वसनीय वाढ झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी अब्जाधीश दावोसला पोहोचत आहेत, असे ‘ऑक्सफॅम’च्या कार्यकारी संचालक गॅब्रिएला बुचर यांनी म्हटले आहे. आधी कोरोनाची साथ आणि आता अन्नधान्य व ऊर्जेच्या किमतीत झालेली मोठी वाढ त्यांच्यासाठी ‘बोनस’ आहे, असेही त्या म्हणाल्या.

‘ऑक्सफॅम’चे मत
- कोरोनातील महागाईचा फटका बसलेल्यांना आर्थिक मदतीसाठी श्रीमंतांवर ‘एकता कर’ लागू करावा.
- नफाखोरी थांबविण्यासाठी बड्या उद्योगांच्या अनपेक्षित नफ्यावर ९० टक्के तात्पुरता जादा नफा कर लादावा.
- कोट्यधीशांच्या संपत्तीवरील २ टक्के आणि अब्जाधीशांवरील पाच टक्के वार्षिक करातून दर वर्षी दोन हजार ५२० अब्ज डॉलर एवढा निधी जमा होईल.
- या संपत्ती कराचा वापर २.५ अब्ज लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी करता येईल.
- या पैशातून जगात पुरेशा लशी उपलब्ध करता येतील.
- गरीब देशांमधील सार्वत्रिक आरोग्य सेवेसाठीही त्याचा उपयोग करता येईल.

दारिद्र्य कमी करण्याच्या अनेक दशकांच्या प्रयत्नांना यश आले असतानाच आता उलट परिणाम दिसत आहे. केवळ जिवंत राहण्यासाठीच्या खर्चात अशक्य वाढ झाल्याने लाखो लोकांसमोर संकट निर्माण झाले आहे.
- गॅब्रिएला बुचर, कार्यकारी संचालक, ऑक्सफॅम