Narendra Modi Tendernama
मुंबई

PM Modi in Mumbai : मेट्रोसह 38000 कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज संध्याकाळी (ता. १९) मुंबईत येत असून यावेळी ते दोन मेट्रोमार्ग सुरु करण्यासह ३८ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. १७,२०० कोटी रुपयांच्या ७ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

तसेच मुंबईतील चारशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या ६,१०० कोटींच्या काँक्रिटीकरणाची सुरुवात मोदी करणार आहेत. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या १,८०० कोटींच्या पुनर्विकास प्रकल्पाची पायाभरणीही मोदी करणार आहेत. मोदी यांनीच काही वर्षांपूर्वी पायाभरणी केलेल्या मुंबईतील दोन मेट्रोमार्ग, २ ए आणि ७ यांचे लोकार्पणही ते करतील. हे दोन्ही प्रकल्प बारा हजार सहाशे कोटी रुपयांचे आहेत.

दहिसर ते अंधेरी या पूर्व आणि पश्चिम मार्गांवर या दोन मेट्रो धावतील. यावेळी मुंबई वन मोबाईल ॲप आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड यांचेही लोकार्पण मोदी करतील. या कार्डद्वारे मेट्रो, लोकल गाड्या, बस या प्रवासासाठी यूपीआय मार्फत डिजिटल पेमेंट करून तिकिटे खरेदी करता येतील. १७,२०० कोटी रुपयांच्या सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पायाभरणीही मोदी यांच्या हस्ते होईल. मालाड, भांडुप, वर्सोवा, घाटकोपर, वांद्रे, धारावी, वरळी येथे हे प्रकल्प उभारले जातील. त्यांची एकत्रित क्षमता २४६० एमएलडी आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना वीस ठिकाणी उघडला जात असून त्याचे उद्घाटनही मोदी करतील. येथे आरोग्यतपासणी, औषधोपचार, रोगनिदान व तपासणी या गोष्टी विनामूल्य होतील. ३६० खाटांचे भांडुप मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, गोरेगावचे सिद्धार्थ नगर हॉस्पिटल (३०६ खाटा) व ओशिवरा मॅटर्निटी होम (१५२ खाटा) यांची पायाभरणीही मोदी करतील. एमएमआरडीए मैदानावर मोदी यांची जाहीर सभा असून तेथूनच यापैकी बहुतेक प्रकल्पांचे उद्घाटन दूरस्थ यंत्रणेद्वारे होईल.

मुंबईतील चारशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरण प्रकल्पाची सुरुवातही मोदी करतील. हा प्रकल्प ६,१०० कोटी रुपयांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाची पायाभरणीही मोदी करतील. हा प्रकल्प १,८०० कोटी रुपयांचा आहे. यामुळे येथील गर्दी तर कमी होईलच पण नव्या सोयीही निर्माण होतील, तसेच या पुरातन इमारतीलाही झळाळी मिळेल. पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कर्जांचे वाटपही मोदी यांच्या हस्ते होईल.