Thane Railway Station Bus Stand Tendernama
मुंबई

'परिवहन'चा हिरवा कंदील; ठाण्यातील 'हे' दोन प्रकल्प अखेर मार्गी

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : ठाणे (Thane) शहरात कळवा रुग्णालयाजवळील एसटी वर्कशॉपच्या जागेवर ठाणे महापालिकेचे (Thane Municipal Corporation) सुपरस्पेशालिटी रुग्णालय (Super specialty Hospital) उभे करण्यास, तसेच ठाणे रेल्वे स्टेशन (Thane Railway Station) जवळील एसटी स्टँडची (ST Stand) जागा भूमिगत पार्कींगसाठी द्यायला परिवहन विभागाने अखेर मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच या दोन्ही जागा ठाणे महानगरपालिकेला हस्तांतरित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी रुग्णालयाला लागून असलेल्या एसटी वर्कशॉपच्या जागेचा पुनर्विकास करून त्याजागी महापालिकेच्या माध्यमातून सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे गेली अनेक वर्षे प्रयत्नशील आहेत. त्यासोबतच ठाणे स्टेशन जवळील एसटी स्टँडच्या जागेवर भूमिगत पार्कींग उभारण्यासाठीही ते आग्रही होते. या अनुषंगाने ही बैठक पार पडली.

याबाबत यापूर्वी झालेल्या बैठकीत या दोन्ही प्रकल्पांचा सुधारित विकास आराखडा परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासमोर सादर करण्यात आला होता. त्यावेळी या दोन्ही योजनांना जागा देण्यासाठी तत्वतः मंजुरी देताना एसटीची गरज आणि पुरेशी जागा उपलब्ध करून दिल्यानंतरच हे भूखंड विकसित करायला परवानगी देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार ठाणे महानगरपालिका आणि परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी एकत्र बसून महामंडळाच्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार सुधारित आराखडा परिवहन मंत्र्यासमोर सादर केला. यातून परिवहन महामंडळाची गरज आणि ठाणे महानगरपालिकेचे हित दोन्ही साध्य होत असल्याने या प्रकल्पांना जागा देण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे शहरात संपूर्ण जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना उत्तम वैद्यकीय सुविधा पुरवणे, तसेच स्टेशनकडे येणाऱ्या वाहनांना पुरेसे पार्कींग उपलब्ध करून देणे, या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असल्याने त्यासाठी हे प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे बनले होते. परिवहन मंत्र्यांनी या दोन्ही मागण्या मान्य केल्याने हे दोन्ही प्रकल्प लवकरच सुरू करणे शक्य होईल, असे मत मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि नगरविकास, एसटी आणि ठाणे महानगरपालिकेचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.