Pagoda Ropeway Tendernama
मुंबई

'पॅगोडा रोप-वे'चे टेंडर 'या' कारणामुळे झाले रद्द

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : महावीर मेट्रो स्थानक ते पॅगोडा (गोराई व्हिलेज) या दरम्यान रोप-वे उभारण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) टेंडर (Tender) मागविले होते. त्यानुसार सौदी अरेबियाच्या (Saudi Arebia) एका कंपनीच्या टेंडरवर शिक्कामोर्तब करण्यात येणार होते; मात्र तिकिटातून महसूल कमी मिळाल्यास कंपनीला नुकसानभरपाई द्यावी लागणार असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. त्यामुळे एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीने हे टेंडर रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच नव्याने टेंडर मागवण्यात येणार आहेत.

गोराई व आजूबाजूच्या भागातील नागरिकांना थेट मुख्य प्रवाहातील भागांना जोडण्यासाठी मेट्रो २ मार्गावरील महावीर मेट्रो स्थानक ते पॅगोडा (गोराई व्हिलेज) दरम्यान ७.२ किलोमीटर लांबीचा रोप-वे उभारण्यासाठी एमएमआरडीए प्रशासनाने आतापर्यंत दोन वेळा टेंडर प्रक्रिया राबवली होती. त्यावेळी कंत्राटदारांनी टेंडरकडे पाठ फिरवली होती.

काही दिवसांपूर्वी मागवण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेला दोन कंपन्यांनी स्वारस्य दाखवले होते. त्यापैकी सौदी अरेबियातील कंपनीचे टेंडर अंतिम करण्यात येणार होती; मात्र एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत ही टेंडर प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टेंडर का रद्द झाले?

- निवड होणाऱ्या कंपनीसोबत करार झाल्यानंतर एका वर्षाच्या कालावधीत पर्यावरण, वन विभाग आणि सीआरझेड परवानगी एमएमआरडीएला घ्यावी लागणार होती.

- वर्षभराच्या कालावधीत परवानगी मिळणे अवघड असल्याने आणि तिकिटातून महसूल कमी मिळाल्यास कंपनीला मोठ्या प्रमाणात नुकसानभरपाई द्यावी लागणार होती.

- वरील मुद्दे उपस्थित होताच समितीने टेंडर प्रक्रिया रद्द केली आहे. त्यानुसार आता नव्याने टेंडर मागवण्यात येणार आहेत.