Mumbai Tendernama
मुंबई

Mumbai : ऑरेंज गेट-मरिन ड्राईव्ह कनेक्टिव्हिटीतील मोठा अडथळा दूर; लवकरच फुटणार नारळ

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : ऑरेंज गेट-मरिन ड्राईव्ह अंतर केवळ पाच मिनिटांत पार करता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) प्रस्तावित भुयारी मार्ग प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाला आहे. ईस्टर्न फ्री वेला कोस्टल रोडशी थेट जोडण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने (बीपीटी) 1.96 हेक्टर जमीन देण्याची तयारी दर्शविली आहे. या प्रकल्पासाठी 7,765 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. आता हे काम सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत सुरू होणार आहे.

पुणे, नवी मुंबई आणि ठाण्याहून दक्षिण मुंबईत येणे सोपे व्हावे यासाठी एमएमआरडीएने २०१३ मध्ये १६.८ किमी लांबीचा पूर्वमुक्त मार्ग बांधला. या मार्गामुळे चेंबूर – सीएसएमटी अंतर केवळ २० ते २५ मिनिटांत पार करणे शक्य झाले आहे. मात्र ऑरेंज गेटजवळ आल्यानंतर नरिमन पॉईंटच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीत अडकावे लागते. या वाहतूक कोंडीतून वाहनांची सुटका करण्यासाठी एमएमआरडीएने पूर्वमुक्त मार्ग, ऑरेंज गेट – मरिन ड्राईव्हदरम्यान भुयारी मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे, नवी मुंबई, ठाण्याहून मुंबईत येणाऱ्या वाहनांना थेट दक्षिण मुंबईत पोहोचणे सोपे व्हावे या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जपानमधील मे. पडॅको कंपनीने या साडेतीन किमी लांबीच्या प्रकल्पाचा बृहत आराखडा तयार केला आहे.

बीपीटीने ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर बोगद्याचे खोदकाम करण्यास सुरुवात होणार आहे. एमएमआरडीएने बीपीटीकडून भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाँचिग सॉफ्ट तयार करण्यासाठी ही जमीन प्रकल्प उभारणाऱ्या कंपनीला सोपवण्यात येणार आहे. प्रकल्पात 6.23 किमी लांबीच्या बोगद्यासाठी महाकाय टनल बोरिंग मशीन (टीबीएम)चा वापर होणार आहे. या बोगद्याचा व्यास 11 मीटर असणार आहे. तर, हा बोगदा जमिनीच्या पृष्ठभागापासून 15 ते 20 मीटर खाली असणार आहे. अशावेळी बोगद्याचे खोदकाम जमिनीच्या खालीच करण्यात येणार आहे. लाँचिंग सॉफ्टच्या माध्यमातून टीबीएम जमिनीच्या खाली उतरवण्यात येणार आहे. वाहनांसाठी बोगद्यात 2-2 लेन बनवण्यात येणार आहे. आपत्कालीन स्थितीत बोगद्यात आणखी 1-1 अशा लेन बनवण्यात येणार आहे. पूर्व द्रुतगती मार्गाला कनेक्ट करण्यासाठी सध्याच्या फ्रीवेच्या जवळपास वायडक्ट आणि ओपन कट मार्ग बनवण्यात आला आहे.

वाहनांसाठी सिग्नल फ्री मार्ग उपलब्ध करण्यासाठी 9.23 किमी लांबीचा मार्ग तयार केला जात आहे. यात जवळपास 6.23 किमी मार्ग जमिनीच्या खाली म्हणजे अंडरग्राउंड असणार आहे. ऑरेंज गेट-मरीन ड्राईव्ह टनल प्रोजक्ट कोस्टल रोड आणि पूर्व द्रुतगतीला थेट जोडणार आहे. प्रकल्पासाठी कास्टिंग यार्डसाठी जवळपास 8 हेक्टर जमिनीची गरज भासणार आहे. बीपीटी यासाठी जमीन देण्यास तयार आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर दक्षिण मुंबईतून जाणारी वाहने थेट ट्रान्सहार्बर लिंकला जोडली जाणार आहेत. यामुळं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अंतर खूप कमी होणार आहे.