Mantralaya Tendernama
मुंबई

'OBC VJNT'ची 'ज्ञानदीप'वर मेहेरबानी वादात; २०० टक्के वाढ 'जैसे थे'

मारुती कंदले

मुंबई (Mumbai) : नागपूरस्थित 'महाज्योती' अर्थात महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेद्वारे ओबीसी व्हीजेएनटी विभागाने एमपीएससीच्या ऑफलाईन प्रशिक्षणासाठी पुण्यातील 'ज्ञानदीप' या संस्थेला प्रस्तावित केलेली सुमारे तिप्पट शुल्क वाढ मोठा गाजावाजा सुरु होताच तूर्तास 'जैसे थे' ठेवण्यात आली आहे. २०२१-२२ मधील टेंडरचा आधार घेत चालू वर्षात या कंत्राटाला मुदतवाढ देण्याची पळवाट मंत्री कार्यालयाने शोधली आहे. मात्र, करारनाम्यातच वर्षाला ६ टक्के दरवाढ मंजूर असताना प्रस्तावित केलेली तब्बल २०० टक्के वाढ वादात अडकली. या निर्णयावरुन मंत्री कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीकास्त्र सुरु झाले. आगामी हिवाळी अधिवेशनात हा वाद अंगलट येईल या भीतीने सध्या हा दरवाढीचा प्रस्ताव थंड बस्त्यात ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्रात अनेक नामांकित कोचिंग क्लासेस असताना ओबीसी व्हीजेएनटी विभागाने पुण्यातील 'ज्ञानदीप' अकादमीवर केलेली विशेष मेहेरबानी चर्चेचा विषय आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा पेटण्याचे संकेत आहेत.

इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग विभागाअंतर्गत चालणार्या 'महाज्योती'कडून एमपीएससी, यूपीएससीसह, जेईई आणि नीट आदी परीक्षांचे प्रशिक्षण दिले जाते. 'महाज्योती'ने एमपीएससीच्या ऑफलाईन प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांसमोर 'ज्ञानदीप' या एकमेव प्रशिक्षण संस्थेचा पर्याय दिला. परीक्षेसाठी २७ वैकल्पिक विषय आहेत. त्यामुळे किमान तीन प्रशिक्षण संस्थांचा पर्याय द्यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. एकाच संस्थेत दीड हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देताना गुणवत्तेबाबत तडजोड होते, शिवाय वैकल्पिक विषयांसाठी अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन मिळत नाही, आदी शंका विद्यार्थ्यांमध्ये होत्या. त्याआधी 'महाज्योती'ने एमपीएससी पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी ६ ऑक्टोबरला पत्र काढून 'ज्ञानदीप' अकादमी पुणे येथे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणी व छायांकित प्रती जमा करण्याची सूचना केली. त्यानंतर अचानकपणे १० ऑक्टोबरला परिपत्रक काढून कागदपत्रे जमा करण्यास स्थगिती दिली. तर १४ ऑक्टोबरला पुन्हा नवे परिपत्रक काढून 'ज्ञानदीप' अकादमीमध्ये १५ ते २७ ऑक्टोबरपर्यंत कागदपत्रे जमा करावी, अशा सूचना देण्यात आल्या.

राज्यसेवा अभ्यासक्रम बदलण्यापूर्वी प्रति विद्यार्थी ४६ हजार रुपयांप्रमाणे हे एका वर्षाचे टेंडर फ्रेम केले होते. या दरानुसार दीड हजार विद्यार्थ्यांसाठी सुमारे ७ कोटी खर्च केले जाणार आहेत. मात्र एमपीएससीने आपले अभ्यासक्रम यूपीएससी मुख्य परीक्षेच्या धर्तीवर बदलले. त्यामुळे 'ज्ञानदीप'ने विद्यार्थ्यांचे शुल्क वाढविण्याची मागणी महाज्योतीकडे केली. यासंदर्भात मंत्रालयातून संस्थेला दरवाढीची मागणी करण्यासाठी अर्ज करा अशा सूचना दिल्याची जोरदार चर्चा आहे. वस्तुतः करारनाम्यानुसार संस्थेला वर्षाला फक्त ६ टक्के दरवाढ देण्याची तरतूद आहे. तरी सुद्धा 'ज्ञानदीप'ने ४६ हजारांवरुन तब्बल १ लाख २६ हजार रुपये दरवाढीची मागणी केलीच कशी अशी शंका व्यक्त केली जात आहे. ही वाढ सुमारे २०० टक्के इतकी आहे. म्हणजेच, सर्वकाही ठरवून सुरु होते. त्यानुसार मंत्री कार्यालय स्तरावरुन 'ज्ञानदीप'साठी प्रति विद्यार्थी प्रशिक्षण शुल्क ४६ हजारांवरुन १ लाख २६ हजार रुपयांपर्यंत वाढवण्याच्या हालचाली सुरु झाल्या. त्यापोटी दीड हजार विद्यार्थ्यांसाठी सुमारे १५ ते १८ कोटी खर्च केले जाणार होते. म्हणजे, मूळ ७ कोटीच्या टेंडरमध्ये तब्बल १० कोटींची वाढ प्रस्तावित केली होती. यापैकी तब्बल सुमारे ८ कोटींचा मोठा वाटा तळे राखणाऱ्यांपर्यंत पोहोचवला जाणार होता अशी जोरदार चर्चा आहे. त्यापोटी मोठी आगाऊ रक्कम पोहोचवली सुद्धा अशीही चर्चा मंत्रालयात सुरु आहे.

राज्यातील इतर नामांकित प्रशिक्षण संस्थांचे राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेचे प्रशिक्षण शुल्क सुमारे ४५ ते ७५ हजारांपर्यंत आहे. या कामात मंत्री अतुल सावे यांचे खासगी सचिव प्रशांत खेडकर यांनी 'ज्ञानदीप'वर विशेष मेहेरबानी केल्याची जोरदार चर्चा आहे. खेडकर यांची 'ज्ञानदीप'चे महेश शिंदे यांच्याशी जवळीक आहे. खेडकर यांची दोन पुस्तके सुद्धा 'ज्ञानदीप'ने प्रकाशित केली आहेत. दरम्यान, महाज्योती, नागपूर मार्फत सन 2021-22 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना राज्य सेवा आयोगाच्या परीक्षांचे प्रशिक्षण नामवंत प्रशिक्षण संस्थांकडून देण्याकरिता ई-टेंडर प्रक्रिया करण्यात आलेली होती. ई-टेंडर प्रक्रियेत एमपीएससीचे प्रशिक्षण देण्यासाठी पुणे स्थित 'ज्ञानदीप' अकादमी या संस्थेची निवड झालेली होती. त्यानुसार संस्थेसोबत सामंजस्य करारनामा करण्यात आलेला होता. या संस्थेस पुढील 2 वर्षांची मुदतवाढ देण्याची तरतूद सामंजस्य करारात असल्यामुळे सन 2022-23 करिता एमपीएससीचे प्रशिक्षण ज्ञानदीप अकादमी, पुणे यांच्यामार्फत निर्धारित केलेल्या दराने देण्यासाठी १ वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय 17 जून 2022 रोजी झालेल्या बैठकीत महाज्योतीच्या संचालक मंडळाने घेतला. मात्र दरम्यानच्या काळात एमपीएससी परीक्षेचा अभ्यासक्रम व पद्धत बदलल्याने एमपीएससी अभ्यासक्रमात आमुलाग्र बदल झाला, त्यामुळे ज्ञानदीप अकादमी, पुणे या संस्थेने नवीन दर निश्चित करण्याबाबत विनंती अर्ज महाज्योती संस्थेस केला होता. त्यासंदर्भात 26.09.2022 च्या संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र दर वाढीबाबत कोणताही निर्णय झाला नाही. दरवाढीचा प्रस्ताव 'जैसे थे' ठेवण्यात आला आहे, अशी माहिती खात्यामार्फत देण्यात आली आहे. याचाच अर्थ ही दरवाढ रद्द करण्यात आली आहे असा नाही, अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांकडून मिळाली.