मुंबई (Mumbai) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दहिसर ते तलासरी या दरम्यानचा रस्ता बारा पदरी होणार असून, त्यासाठी सहाशे कोटी मंजूर केल्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केली आहे. यातून बारा पदरी काँक्रिट रस्ता, महापालिका हद्दीत ४० मीटरचा रिंगरस्ता, महामार्गापासून शहरांमध्ये येणाऱ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण ही कामे केली जाणार आहेत.
पालघर-वसई जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमासाठी ते वसई-विरारमध्ये आले होते. या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. वसई-विरार महापालिका हद्दीत रस्त्यांची अनेक कामे प्रलंबित होती. ही सर्वच कामे केंद्रीय मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असल्याने आ. हितेंद्र ठाकूर यांनी सातत्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. शुक्रवारी गडकरी वसई-विरारमध्ये आले असता पुन्हा एकदा हितेंद्र ठाकूर यांनी या मागण्यांबाबत नितीन गडकरींना याबाबतची माहिती दिली.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेता दहिसर ते तलासरी हा मार्ग बारा पदरी करावा. तसेच 110 किलोमीटरच्या या टप्प्याचे काँक्रिटीकरण करावे, या प्रमुख मागणीसह अनेक प्रकल्पांबाबत हितेंद्र ठाकूर यांनी गडकरी यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या काँक्रिटीकरणासह रूंदीकरण करण्यासाठी ६०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
वसई-विरारची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर वाहनांची संख्याही वाढत आहे. तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतुकीतही प्रचंड वाढ झाली आहे. या सर्वाचा विचार करून आम्ही मागणी केलेले सर्व प्रकल्प जलद गतीने पूर्ण होण्याची आवश्यकता आहे. आम्ही सातत्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या प्रकल्पांसाठी पाठपुरावा केला. या प्रयत्नांना यश येत मंत्री नितीन गडकरींनी ६०० कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर केला. यामुळे वसई-विरारचा विकास झपाट्याने होईल, असे आ. हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.