Mumbai Tendernama
मुंबई

रेकॉर्ड ब्रेक! फक्त दहाच दिवसात १७० कोटींच्या पुलावरील उडालं डांबर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : १७० कोटींचा खर्च करुन दहा दिवसांपूर्वीच उद्घाटन झालेल्या मुंबई उपनगरातील एका पुलावरील डांबरीकरण पहिल्याच पावसात धुवून गेले आहे. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्वीट करत या रस्त्याचे उद्घाटन मुंबईकरांसाठी केले होते की कंत्राटदारांच्या टक्केवारीसाठी? असा सवाल उपस्थित करत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत रस्त्याची दुरावस्था झाल्याचे दिसून येते. त्यामुळे रस्त्याच्या दर्जाबद्दल विरोधकांनी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य केले आहे.

बोरिवली पश्चिमेकडील आर. एम भट्ट मार्ग येथे मुंबई महापालिकेच्यावतीने नवीन उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले होते. १० दिवसांपूर्वी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते याचे लोकार्पण झाले. मात्र या उड्डाणपूलावरील रस्त्यांचे डांबर निघून खडी उघडी पडली आहे. त्यामुळे या पुलाच्या कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होत आहे.

या उड्डाणपुलामुळे बोरिवलीकरांची वाहतूक कोंडीतून सुटका झाली. याठिकाणी दररोज सकाळी आणि संध्याकाळी अर्धा ते पाऊण तास वाहतूक कोंडीत जातो. पावसाळ्यात तर कहर होतो मात्र उड्डाणपुलामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न निकाली लागला. मात्र लोकार्पणानंतर अवघ्या काही दिवसांतच रस्त्यांवर खडी विखुरल्याचे दिसून आले. बोरिवली पश्चिममधील लिंक रोड ते फिल्डमार्शल करिअप्पा उड्डाणपुलाला जोडणारा हा उड्डाणपूल आहे.

हा उड्डाणपूल प्रामुख्याने लिंक रोड आणि पश्चिमी द्रुतगती महामार्ग यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. येथील उड्डाणपुलामुळे श्मामाप्रसाद मुखर्जी चौक, कल्पना चावला चौक, साईबाबा नगर, राजेंद्र नगर आणि जवळपासच्या वाहतुकीला मदत होणार होती. स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन आणि कल्पना चावला चौक या दोन महत्त्वाच्या जंक्शनवरून हा पूल विस्तारीत झाला असल्याने वाहतुकीचा वेग वाढणारच आहे. तसेच प्रवासाच्या वेळेतही बचत होते. हा पूल बांधण्यासाठी सुमारे १७० कोटी रुपये खर्च झाला आहे.