मुंबई (Mumbai) : ठाणे मनोरूग्णालयाच्या जागेत ठाणे स्मार्ट सिटीतंर्गत नवीन रेल्वे स्थानक बांधण्यात येत आहे. २०१८ पासून या प्रकल्पाला सुरुवात झाली असून आतापर्यंत केवळ ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल असा दावा करण्यात आला होता. मात्र आता या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी दीड ते दोन वर्षे लागणार असल्याचे ठाणे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
या संपूर्ण प्रकल्पात ३.७७ एकर जमिनीवर रेल्वे काम करणार असून १० एकरवर ठाणे महापालिका काम करणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ३२७ कोटींचा असून यामध्ये ठाणे महापालिका १४२ कोटी तर रेल्वेकडून १८५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. २०१८ साली या प्रकल्पाचा खर्च हा २६३ कोटी अपेक्षित धरण्यात आला होता. मात्र आता यामध्ये ६४ कोटींची वाढ झाली असून हा खर्च ३२७ कोटींवर गेला आहे. नवीन रेल्वे स्थानकाच्या आड येणाऱ्या तब्बल १७० झोपड्यांच्या सर्व्हेक्षणाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. पावसाळ्यानंतर या सर्व झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याचे नियोजन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. धर्मवीर नगर म्हणून हा परिसर ओळखला जात असून या झोपड्या हटवल्यानंतर विस्तारित रेल्वे स्थानकाच्या कामाला गती मिळणार आहे.
नवीन रेल्वे स्थानक १४.८३ एकर जागेवर होणार असून त्यापैकी ३.७७ एकर जागेवर रेल्वे रूळ व तळमजला अधिक दोन मजली इमारत उभी राहणार आहे हे काम रेल्वे करणार आहे. या स्थानकांवर एकूण तीन फलाटांपैकी एक होम प्लॅटफॉर्म आणि तीन पादचारी पूल असणार आहेत. परिचालन क्षेत्राचे काम ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेतून होत आहे. स्थानकाच्या इमारती समोर १५० मीटर लांब व ३४ मीटर रुंद असा सॅटिस डेक असणार आहे. तर २.५ एकर जागेमध्ये २५० चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी पार्किंग आहे. नवे ठाणे स्थानक उभारल्याने या स्थानकामध्ये मुंबईला जाणाऱ्या गाड्या होम प्लॅटफॉर्मवरून सुटणार आहेत. तसेच कर्जत कल्याणच्या दिशेला जाणाऱ्या गाड्या दोन व तीन प्लॅटफॉर्म वरून सुटणार आहेत. नव्या स्थानकामुळे ठाणे स्थानकातील सुमारे ३१ टक्के आणि मुलुंड स्थानकातील २१ टक्के प्रवाशांचा भार कमी होणार आहे. स्थानकाला तीन मार्गिका जोडल्या जाणार आहेत. पहिली मार्गिका नवीन ज्ञानसाधना कॉलेजच्या मागून अपडाऊन असणार आहे, त्या पूर्वद्रुतगती महामार्गाला जोडण्यात येणार आहेत. दुसरी मार्गिका जुने ज्ञानसाधना कॉलेज मार्गावर अपडाऊन असणार आहे. तर तिसरी मार्गिका मुलुंड चेक नाका मार्गे बाहेर पडणारी अपडाऊन असणार आहे.