Jitendra Awhad Tendernama
मुंबई

Thane : रंगरंगोटीच्या 375 कोटीच्या कामात थुकपट्टी: जितेंद्र आव्हाड

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : ठाणे (Thane) शहरात सुरु असलेल्या ३७५ कोटींच्या रंगरंगोटीच्या कामांवरुन माजी गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ठाणे महापालिकेला लक्ष्य केले आहे. रंगरंगोटीचे जे टेंडर काढण्यात आले आहे, त्यात ज्या काही अटी शर्तीने कामे होणे अपेक्षित होते, त्यानुसार कामे न होता केवळ थुकपट्टी केली जात असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. हे टेंडर कोणाच्या मेहरबानीने कोणाला मिळाले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

गेल्या काही दिवसापासून बाळासाहेबांची शिवसेना आणि आव्हाड यांच्यात संघर्ष सुरु आहे. आता आव्हाडांचा अंत सुरु झाला असल्याचे भाष्य बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून काही दिवसांपूर्वीच करण्यात आले. तसेच विकास कामांच्या मुद्यावरुन देखील आव्हाड आणि बाळासाहेबांची शिवसेना यात श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.

आता थेट शहरात सुरु असलेल्या सुशोभीरणाच्या कामावरच आव्हाड यांनी मोठा आक्षेप नोंदविला आहे. शहरात सुरु असलेल्या सुशोभीकरणाच्या आणि रस्त्यांच्या कामांसाठी राज्य शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. त्यानुसार शहरात ही कामे सुरु आहेत. रंगरंगोटीच्या याच कामांवरुन आव्हाड यांनी ट्विटरद्वारे महापालिकेला पुन्हा लक्ष्य केले आहे.

सध्या ठाण्यामध्ये रंगरंगोटीचे काम जोरदार सुरु आहे. पण, मुळात टेंडरमध्ये ज्या अटी व शर्थी नमूद करण्यात आल्या आहेत; त्यामध्ये संपूर्ण भिंत खरवडून घेऊन त्याच्यावर पांढरा रंग मारुन तसेच परत एकदा रंगाचा हात मारुन मगच जी काही रंगरंगोटी करायची आहे ती करावी असे अपेक्षित आहे. ठाणे शहरात मात्र तसे काहीही न करता सरळ भिंतीवर रंगकाम केले जात आहे. पावणे चारशे कोटी रुपयांचे हे टेंडर असल्याचे समजते. हे टेंडर कोणाच्या मेहरबानीवर मिळाले आणि कोण काम करीत आहे असा सवालही त्यांनी केला आहे. त्यातही अशी थुकपट्टीची कामे का होत आहेत याकडे महापालिकेचे लक्ष आहे की नाही. आतापर्यंत रंगरंगोटी झालेली सगळी कामे ही थुकपट्टीचीच आहेत. कमीत-कमीत यापुढे तरी टेंडरनुसार काम होईल हीच अपेक्षा, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.