Navi Mumbai Municipal Corporation Tendernama
मुंबई

वर्षाला सात कोटींची बचत; मुंबई पाठोपाठ नवी मुंबईही...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : सायन-पनवेल (Sion-Panvel) महामार्गासह नवी मुंबई शहरातील सर्व रस्ते, पदपथावर एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने (Navi Mumbai Municipal Corporation) घेतला आहे. शहरात ३३ हजार पथदिव्यांचे फिटिंग बदलले जाणार आहेत. त्यामुळे वीजबिलामध्येही बचत होणार असून वर्षाला महापालिकेच्या सात कोटी रुपयांची बचत होणार आहे.

पामबीच मार्गापासून कामाला सुरुवात केली जाणार असून लवकरच शहर एलईडी दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघेल. या दिव्यांमुळे विजेची बचत होणार असून पर्यायाने खर्चही कमी होईल. नवी मुंबई पालिकेने शहरातील सर्व मुख्य व अंतर्गत रस्त्यांच्या कडेला पथदिवे बसविले आहेत. नागरी वसाहतींसह एमआयडीसीमध्येही पथदिवे बसविले असून त्यांची नियमित देखभालही केली जाते. सद्यस्थितीत साधे दिवे असल्यामुळे त्याचा पुरेसा प्रकाश पडत नाही. शहरातील पथदिव्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका आयुक्‍त अभिजित बांगर यांनी एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी टेंडर प्रक्रिया पूर्ण केली असून आठवडाभरात पामबीच मार्गावर एलईडी दिवे बसविण्याचे काम सुरू केले जाणार आहे.

नवी मुंबईतील क्वीन नेकलेस म्हणून पाम बीचची ओळख आहे. एलईडी दिव्यांमुळे पामबीचच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. यानंतर टप्प्याटप्प्याने शहरातील सर्व विभागातील जुन्या दिव्यांच्या जागेवर एलईडी दिवे बसविले जाणार आहेत. महापालिका कार्यक्षेत्रात जवळपास ३३ हजार पथदिव्यांचे फिटिंग आहेत. सायन पनवेल महामार्गावरील दिवे वारंवार बंदच असतात. यामुळे पालिकेने या मार्गावरील पथदिव्यांची जबाबदारी घेतली आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने साडेआठ कोटी रुपये नवी मुंबई महापालिकेला दिले आहेत. शहरातील दिवे बदलून झाल्यानंतर महामार्गावर एलईडी दिवे बसविले जाणार आहेत. नवी मुंबईमध्ये एलईडी दिवे बसविल्यामुळे वीजबिलामध्येही बचत होणार आहे. वर्षाला जवळपास सात कोटी रुपयांची बचत होणार असून एलईडी दिव्यांनी शहर उजळून निघणार आहे.

नवी मुंबईमध्ये पामबीच मार्गावर सर्व ठिकाणी एलईडी दिवे बसविले जाणार आहेत. यामुळे सर्व रस्त्यावर पुरेशा प्रकाश राहणार असून अपघाताचे प्रमाण कमी होईल. एलईडी दिव्यांमुळे वीजबिलांमध्येही बचत होणार आहे. शिवाय देखभाल-दुरुस्‍तीवरील खर्चही कमी होईल.
- अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई