Navi Mumbai Municipal Corporation

 

Tendernama

मुंबई

आधी काम, मग टेंडर; नवी मुंबई महापालिकेचा उलटा कारभार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विकासकामे करताना प्रथम संबंधित कामाचे टेंडर निघते, सर्वात कमी किंमतीत जो कंत्राटदार (Contractor) हे काम करून देण्यास तयार असेल त्या कंत्राटदाराला हे काम करण्याची अनुमती मिळते व नंतर कामाला सुरुवात होते. मात्र नवी मुंबई महापालिका याला अपवाद असल्याचे निदर्शनास येत आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षांनी नवी मुंबई महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश केला आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी नवी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. शहर स्वच्छते सोबतच शहर सुंदर बनविण्याकडे यंदा नवी मुंबई मनपा लक्ष केंद्रित करत आहे. यासाठी भिंतींना रंग रोंगोटी, रस्त्याच्या दुभाजकावर कारंजे बसविणे, मुख्य चौकात फ्लेमिंगो बसविणे, मैदानांमध्ये शोभेचे पुतळे उभारणे, नक्षीदार भिंत उभारणे अशी अनेक कामे या स्वच्छ भारत सर्वेक्षणांतर्गत करण्यात येत आहेत.

ही काम करत असताना प्रथम या कामाचे टेंडर निघते, सर्वात कमी किंमतीत जो कंत्राटदार हे काम करून देण्यास तयार असेल त्या कंत्राटदाराला हे काम करण्याची अनुमती मिळते व नंतर कामाला सुरुवात होते. मात्र नवी मुंबई महापालिका याला अपवाद असल्याचे निदर्शनास येत आहे. नवी मुंबई शहरातील अश्या शेकडो कामांचे टेंडर शुक्रवारी 12 मार्च रोजी निघाले. हे टेंडर भरायची अंतिम मुदम 25 मार्च पर्यंत आहे. मात्र नवी मुंबईतील नेरुळ जुईनगर याठिकाणी भिंतींना रंग रंगोटी, रस्त्याच्या दुभाजकावर कारंजे बसविणे, मुख्य चौकात फ्लेमिंगो बसविणे, मैदानांमध्ये शोभेचे पुतळे उभारणे, नक्षीदार भिंत उभारणे अश्या कामांचे टेंडर तर निघाले मात्र ही कामे आधीच पूर्ण झाल्याचे पहायला मिळत आहेत.

जर काम आधी पूर्ण झाले तर या कामांचे टेंडर काम झाल्यावर कसे काय काढण्यात येत आहेत हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. वर्क ऑर्डर नसताना काम कसे केले हा देखील प्रश्न आता उपस्थित होतो आहे. केवळ नेरुळ व जुईनगर मध्ये अशी 15 पेक्षा अधिक कामे आहेत जी पूर्ण झाली असताना त्यांचे टेंडर आता काढण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण नवी मुंबईत अशी किती कामे झालीत असा प्रश्न उपस्थित करत हा भोंगळ कारभार करणाऱ्या कार्यकारी अभियंत्याची चौकशी करा अन्यथा याविरोधात आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन चव्हाण यांनी दिला आहे.