Morabe Dam Tendernama
मुंबई

Mumbai: मोरबे धरणावर जलकुंभ आणि शुद्धीकरण प्रकल्प; 70 कोटींचे बजेट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : नवी मुंबई महापालिकेने मोरबे धरणावर भोकरपाडा येथे १५० एमएलडी क्षमतेचा नवा जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे ४७ कोटी रुपये खर्चाच्या या कामाची सध्या टेंडर प्रक्रिया सुरू आहे. तसेच याचठिकाणी २.५ एमएलडी क्षमतेचा नवा जलकुंभ ही बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यावर सुमारे १९ कोटी ५० रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

मोरबे धरण ताब्यात घेतल्यानंतर नवी मुंबई महापालिकेने पूर्वीच्या ३०० एलएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढवून तो ४५० एमएलडीचा केला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १९८७ बांधलेल्या हा जलशुद्धीकरण प्रकल्प जीर्ण होत चालला असून त्याची क्षमता कमी होत आहे. अनेक ठिकाणची यंत्रसामग्री नादुरुस्त होत आहे. तांत्रिक क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे. प्रकल्पाचे तंत्रज्ञान सुद्धा कालबाह्य होत चालले आहे. यामुळे सध्याच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाशेजारी मोकळ्या जागेवर १५० एमएलडी क्षमतेचा नवा जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या ठिकाणी नवे फिल्टरबेड टाकण्यात येणार आहे. या कामावर ४७ कोटी ३४ लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता संजय देसाई दिली. सध्या याबाबतची टेंडर प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काम पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबई शहराला सुरळीतपणे शुद्ध पाणी पुरवठा होणार आहे.

नव्या १५० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर महापालिकेने नंतर वाढविलेल्या १५० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने बांधलेल्या जुन्या ३०० एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प मोडीत काढण्यात येणार आहे. जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात २.५ एमएलडी क्षमतेचा नवा जलकुंभ ही बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या कामावर १९ कोटी ५० रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.