मुंबई (Mumbai) : नवी मुंबई महापालिकेत 50 कोटींच्या कामाचे वाटप करताना आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे, त्यामुळे हे टेंडर रद्द करत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
ठाणे लोकसभेच्या उप जिल्हा निवडणूक अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघ आणि नवी मुंबई महापालिका आयुक्त यांच्याकडे केलेल्या तक्रारीत अनिल गलगली यांचे म्हणणे आहे की राज्यात निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असूनही नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रभारी शहर अभियंता संजय देसाई यांनी 50 कोटींचे टेंडर उघडण्याचे धाडस केले आहे. हे काम पुन्हा एकदा 'अश्विनी इन्फ्रास्ट्रक्चर' या कंपनीस मिळाले आहे. संजय देसाई यांनी एका विशिष्ट कंपनीस केलेली उघड मदत आणि आचारसंहितेचे केलेले उल्लंघन लक्षात घेणे आवश्यक आहे. 4 जून 2024 नंतरही हे टेंडर उघडले जाऊ शकले असते पण देसाई हे सेवानिवृत्त होत असल्याने त्यांनी आचारसंहिता आणि नियमाचे उल्लंघन करत काम बहाल केल्याची तक्रार गलगली यांची आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून प्रभारी शहर अभियंता पदांवर असलेल्या संजय देसाई यांची निवडणूक पूर्वी बदली का करण्यात आली नाही? याबाबत शासन आणि आयुक्तांकडे गलगली यांनी यापूर्वी लेखी तक्रार केली होती. टेंडर 29 मे 2024 रोजी उघडण्याचे प्रयोजन काय आहे? याबाबत निवडणूक आयोगाची परवानगी संजय देसाई यांनी घेतली आहे का? सेवानिवृत्त होण्याआधी घाईघाईने टेंडर उघडून विशिष्ट कंपनीवर मेहरबानी करण्याची आवश्यकता काय आहे? असे प्रश्न विचारत संजय देसाई यांनी निवडणूक दरम्यान आदर्श आचारसंहिता धुडकावून केलेल्या अन्य कामांची माहिती मागवून कार्यवाही करणे. याच प्रकारे अजून किती टेंडर उघडण्यात आले आणि किती बिले देण्यात आली, याची सखोल चौकशी करण्याची मागणी गलगली यांनी केली आहे.