tribal development department Tendernama
मुंबई

Nashik : नाशकातील आदिवासी विद्यापीठाबाबत राज्यपालांनी काय केली घोषणा?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : आदिवासी बांधवांसाठी नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यात येईल. त्यात ८० टक्के आदिवासी, तर २० टक्के अन्य विद्यार्थ्यांचा समावेश राहील, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी नाशिकच्या शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, आदिवासी बांधवांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्या माध्यमातून विकास कामे सुरू आहेत. या भागातील सामाजिक विकासासाठी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल. या विद्यापीठात अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान आदी विषयांच्या सर्वोत्तम सुविधा असतील. नाशिक औद्योगिकदृष्ट्या विकसित होत असल्याने या विद्यापीठातील विद्यार्थांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

आदिवासी आणि डोंगरी भागातील विविध प्रश्नांची आपल्याला जाणीव असल्याचे नमूद करून ते पुढे म्हणाले की, आदिवासी भागातील आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था सक्षम करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरतीसाठी निर्देश देण्यात येतील. विद्यापीठातील प्राध्यापक भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे करण्याच्या सूचना देण्यात येतील, यासंदर्भात विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करण्यात आली आहे.

राजभवन येथे आदिवासी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आदिवासी बांधवांचे प्रश्न जाणून घेत ते सोडविण्यासाठी आदिवासी लोकप्रतिनिधी यांची राजभवन येथे बैठक घेण्यात येईल, असे सांगितले.

पालकमंत्री दादा भुसे यांनी नार - पार प्रकल्प मंजूर केल्याबद्दल राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांचे आभार मानले. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, आमदार किशोर दराडे, मुफ्ती मोहम्मद इस्माईल, देवयानी फरांदे, सीमा हिरे, नितीन पवार, राहुल ढिकले, हिरामण खोसकर आदी उपस्थित होते.

आदिवासी विकास विभागात ६१६ पदांची भरती लवकरच
आदिवासी विकास विभागातील गट - क संवर्गातील विविध रिक्त पदांकरिता २३ नोव्हेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. एसईबीसी संवर्गाचा समावेश करून नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिले होते. त्यामुळे पूर्वीची जाहिरात स्थगित करण्यात आली होती. आता विभागातील बिंदुनामावली अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार ६१६ पदांच्या भरतीसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल आणि विभागातील गट - क संवर्गातील भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली.

वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल - मुख्य लिपिक, आदिवासी विकास निरिक्षक, वरिष्ठ लिपिक - सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष), गृहपाल (स्त्री), अधीक्षक (पुरुष), अधिक्षक (स्त्री), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/ मुख्य लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ), सहाय्यक ग्रंथपाल, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, कॅमेरामन - कम - प्रोजेक्टर ऑपरेटर, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक ही  गट - क संवर्गातील विविध पदे विभागात भरण्यात येणार आहेत.