Mumbai Tendernama
मुंबई

Narendra Modi : भारतीय रेल्वे प्रवाशांना देणार सुखद धक्का! असे का म्हणाले PM नरेंद्र मोदी?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : भारतीय रेल्वे ही प्रवाशांच्या सुविधेसह देशातील कृषी आणि औद्योगिक क्षेत्रांच्या प्रगतीची वाहक आहे. रेल्वे यंत्रणेत अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीसह भारतीय रेल्वेचा कायाकल्प होत असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले.

प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे मध्य व पश्चिम रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानके व रेल्वे उड्डाणपूल व रेल्वे अंडरपासच्या भूमीपूजन व लोकार्पण, उद्घाटन कार्यक्रम झाला. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. मरिन लाईन्स रेल्वे स्थानक, मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, माजी आमदार राज पुरोहित, अपर महाप्रबंधक प्रकाश मिश्र हे उपस्थित होते.

41 हजार कोटींचे रेल्वे प्रकल्प, अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत 554 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास, 1500 ओव्हर ब्रीज आणि अंडरपासचे भूमिपूजन व लोकार्पण, उद्घाटन यावेळी करण्यात आले.

मोदी म्हणाले, देशात विविध क्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर व प्रचंड गतीने होत आहेत. याद्वारेच रोजगारासाठीही मोठी चालना मिळत आहे. रेल्वे यंत्रणाही वेगाने बदलत आहे. रेल्वेचा कायापालट होत आहे. रेल्वेस्थानके अत्याधुनिक सुविधांनी युक्त करण्यासाठी अमृत भारत रेल्वेस्टेशन योजनेचा आरंभ करण्यात आला.

या अत्याधुनिकीकरणामुळे रेल्वे स्थानक परिसरात रोजगार निर्मितीलाही मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. अमृत भारत स्टेशन योजना विरासत आणि विकास या दोन्हीचे प्रतिक आहे. प्रत्येक रेल्वेस्थानकाची उभारणी ही तेथील सांस्कृतिक, ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित असणार आहे. या स्थानकांमध्ये दिव्यांग आणि वरिष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा असणार आहेत.

रेल्वेचे मोठ्या प्रमाणावर विद्युतीकरण करण्यात येत आहे. रेल्वे स्थानकावरील स्वच्छता हे आज वैशिष्ट्य झाले आहे. भारतीय रेल्वे देशवासीयांसाठी 'ईज ऑल ट्रव्हल' झाले आहे. भारतीय रेल्वे विभागाच्या अत्याधुनिकीकरणासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला जात आहे. 'वन नेशन वन प्रॉडक्ट' ही योजनाही रोजगार निर्मितीला चालना देणार ठरत असल्याचे मोदी यांनी सांगितले.