Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit Pawar Tendernama
मुंबई

Nagpur : विदर्भात ‘या’ 5 ठिकाणी उभारणार आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : विदर्भात नागपूर येथे 3 तर अमरावती जिल्ह्यात 2 अशा 5 ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे संत्रा उत्पादकांना योग्य भाव मिळून योग्य प्रतीचा संत्रा देशात आणि परदेशात पाठविता येईल.

उपमुख्यमंत्री तथा तत्कालिन वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात याची घोषणा केली होती. नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल व कळमेश्वर व अमरावती जिल्ह्यातील मोर्शी व बुलढाणा या ठिकाणी ही केंद्रे उभारण्यात येतील. या केंद्रांमध्ये पॅक हाऊस, शीतगृह, वॅक्सिन युनिट असेल. तसेच या ठिकाणी तयार होणाऱ्या उपपदार्थांवर प्रक्रिया करण्याच्या सुविधा उभारण्यात येतील.

या योजनेचा लाभ सहकारी प्रक्रिया संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी उद्योजक घेऊ शकतील. योजनेत उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी अनुदान देण्यात येईल. प्रत्येक लाभार्थींनी १५ टक्के स्वत:चा निधी खर्च करणे आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार उर्वरित ८५ टक्के बँकेकडून कर्ज मंजूर करुन घ्यावे लागेल. प्रकल्पाच्या ५० टक्के मर्यादेपर्यंतचे अनुदान हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लाभार्थीच्या बँकेत जमा करण्यात येईल. या योजनेसाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे हे नोडल असतील.