Crematorium Tendernama
मुंबई

मुंबईकरांचा 'अंतिम प्रवास' होणार Eco Friendly; लवकरच BMC ...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : स्मशानभूमीमध्ये लाकडाचा वापर करून अंतिम संस्कार करण्यासाठी एका मृतदेहाला ३०० किलो लाकूड लागते. त्यासाठी सरासरी दोन झाडे तोडावी लागतात. मुंबईतील पारंपरिक १४ स्मशानभूमींमध्ये दरवर्षी साधारणपणे ६ हजार २०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. त्यासाठी वर्षभरात साधारणपणे १८ लाख ६० हजार किलो लाकडांचा वापर केला जातो. परिणामी पर्यावरणावर त्याचा मोठा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे आगामी काळात मुंबईत पारंपरिक स्मशानभूमींपैकी १४ स्मशानभूमींमध्ये लाकडांऐवजी 'ब्रिकेट्स बायोमास'चा वापर करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी लवकरच टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून अंत्यसंस्कारासाठी विविध पर्यायांची चाचपणी करण्यात येत आहे. त्यानुसार शेतातील कचरा आणि वृक्ष कचऱ्यांपासून तयार केलेल्या 'ब्रिकेट्स बायोमास'चा वापर तुलनेने अधिक पर्यावरणपूरक असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार महापालिकेच्या १४ पारंपरिक स्मशानभूमींमध्ये लाकडांऐवजी 'ब्रिकेट्स बायोमास'चा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

मुंबईतील विविध स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कारासाठी पालिकेद्वारे निःशुल्क सुविधा उपलब्ध केली जाते. या अंतर्गत पारंपरिक दहन स्मशानभूमी, विद्युत स्मशानभूमी आणि पीएनजी स्मशानभूमींचा समावेश होतो. आता पालिकेतर्फे अंत्यसंस्कारासाठी 'ब्रिकेट्स बायोमास'चा वापरही होणार असून, त्यासाठी लवकरच टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

ब्रिकेट्स बायोमास म्हणजे काय?

1. 'ब्रिकेट्स बायोमास' हे शेती कचरा व वृक्ष कचऱ्यापासून तयार करण्यात येते. शेती कचऱ्यातील जवळपास एक तृतीयांश भाग फेकून दिला जातो. या कचऱ्याचा वापर करून पर्यावरणपूरक ब्रिकेट्स तयार केली जातात.

2. लाकडांपेक्षा 'ब्रिकेट्स बायोमास'मुळे प्राप्त होणारी 'ज्वलन उष्णता' अधिक असल्याने प्रत्येक मृतदेहासाठी २५० किलो 'ब्रिकेट्स बायोमास' पुरेसे असते. पहिल्या टप्प्यात मुंबईतील १४ स्मशानभूमीत ब्रिकेट्स बायोमासचा वापर केला जाणार आहे.

3. मुंबईतील १४ स्मशानभूमींमध्ये दरवर्षी साधारणपणे ६ हजार २०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. त्यासाठी वर्षभरात साधारणपणे १८ लाख ६० हजार किलो लाकडांचा वापर केला जातो.

या स्मशानभूमीत होणार वापर

'डी' विभागातील मंगलवाडी स्मशानभूमी, 'ई' विभागातील वैकुंठधाम हिंदू स्मशानभूमी, 'एफ उत्तर' विभागातील गोयारी हिंदू स्मशानभूमी, 'जी उत्तर' विभागातील धारावी हिंदू स्मशानभूमी, 'एच पश्चिम' विभागातील खारदांडा हिंदू स्मशानभूमी, 'के पश्चिम' विभागातील वर्सोवा हिंदू स्मशानभूमी, 'पी उत्तर' विभागातील मढ हिंदू स्मशानभूमी, 'आर दक्षिण' विभागातील वडारपाडा हिंदू स्मशानभूमी, 'आर उत्तर' विभागातील दहिसर हिंदू स्मशानभूमी, 'एल' विभागातील चुनाभट्टी हिंदू स्मशानभूमी, 'एम पूर्व' विभागातील चिताकॅम्प हिंदू स्मशानभूमी, 'एम पश्चिम' विभागातील आणिक गाव हिंदू स्मशानभूमी, 'एस' विभागातील भांडुप गुजराती सेवामंडळ स्मशानभूमी आणि 'टी' विभागातील मुलुंड नागरिक सभा हिंदू स्मशानभूमी.