मुंबई (Mumbai) : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्य सरकारने विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत, पण चर्नी रोडच्या मराठी भाषा भवनाचा राज्य सरकारला विसर पडला आहे. चर्नी रोड येथील नियोजित मराठी भाषा भवनाची गेल्या दीड वर्षात एक वीटही रचली गेलेली नाही. मराठी भाषा भवनसाठी 260 कोटी रुपयांची आर्थिक तरतूदही धूळखात पडून आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्नी रोड येथे मराठी भाषा भवन उभारण्यात पुढाकार घेतला. मराठी भाषेचा विकास व संवर्धन करण्यासाठी तसेच जगभरातील मराठी भाषिकांना जोडण्यासाठी 2022 मध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन करण्यात आले होते, पण त्यानंतर राज्यातील सरकार बदलले.
नव्या सरकारने मराठी भाषा भवनासाठी 260 कोटी रुपयांची आर्थिक तरतूदही केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनांनुसार मराठी भाषा भवनाच्या आराखड्यात बदलही करण्यात आले आहेत. पण मागील दीड वर्षात मराठी भाषा भवनाच्या बांधकामाची एक वीटही रचलेली नाही.
राज्य सरकारने बैठका घेतल्या, आर्थिक तरतूदही केली. शेजारील शिक्षण विभागाची जागाही दिली, पण प्रत्यक्षात बांधकाम सुरू केलेले नाही. सध्या मराठी भाषा भवनाच्या नियोजित प्रकल्पाचा भूखंड रिकामा पडला आहे. भूखंडाच्या आत गवत उगवले आहे. आतील दृश्य कोणाच्या नजरेस पडू नये म्हणून बाहेर लोखंडी गेट लावले आहेत. कोणालाही आतमध्ये सोडले जात नाही. सध्या मराठी भाषा भवनाच्या भूखंडाचे विदीर्ण चित्र आहे.