Gokhale Bridge Andheri Tendernama
मुंबई

Mumbai : 'या' पुलाच्या कामात स्थापत्य कौशल्य का लागले पणाला? देशातला अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग!

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : अंधेरी पूर्व-पश्चिमला जोडणारा गोखले पूल (Gokhale Bridge) सुरू होण्यासाठी मुंबईकरांना आता आणखी चार महिने वाट पाहावी लागणार आहे. हा पूल सुरू करण्यासाठी आतापर्यंत प्रशासनाकडून तीन ते चार वेळा मुहूर्त जाहीर करण्यात आला होता. अलीकडेच नोव्हेंबरमध्ये हा पूल सुरू होईल, असा दावा करण्यात आला होता. मात्र आता हा पूल पुढील वर्षी 15 फेब्रुवारीपासून सुरू होईल, असे मुंबई महापालिका (BMC) प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, गोखले पुलाच्या गर्डरचे लाँचिंग करणे, गर्डर उत्तरेकडे सरकवणे आणि पुलाचा गर्डर सरकवल्यानंतर सुमारे 1300 टन वजनी गर्डर साडेसात मीटर खाली आणणे हे कौशल्यपूर्ण काम येत्या काळात होणार आहे. एखाद्या पुलाच्या कामात 7.5 मीटर उंचीवरून गर्डर खाली आणायचा हा देशातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे.

अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा हा गोखले पूल 1975 मध्ये बांधण्यात आला आहे. या पुलाचा काही भाग 3 जुलै 2018 मध्ये कोसळून दोघांचा मृत्यू झाल्यामुळे या पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता.

नोव्हेंबर 2022 पासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मात्र हा पूल अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा असल्याने परिसरात वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अंधेरीसह सांताक्रुझ ते जोगेश्वरी या भागात प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. असे असताना महापालिकेने दिवाळीपर्यंत पूल सुरू होण्याची घोषणा करून दिलासा दिला होता, मात्र या पुलाचे काम आता लटकले आहे.

गोखले पुलाच्या गर्डर कामाच्या नियोजनासाठी महापालिका आणि पश्चिम रेल्वेची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी गोखले पुलाच्या रेल्वेवरील भागात गर्डर लाँचिंग करण्यासाठी पश्चिम रेल्वेमार्फत ब्लॉकसाठी अधिक कालावधी मिळावा अशी विनंती महापालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना केली. यावेळी या ब्लॉकसाठी अधिक कालावधी देण्यासाठी पश्चिम रेल्वेकडूनही दुजोरा देण्यात आला.

गोखले पुलाच्या गर्डरचे लाँचिंग करणे, गर्डर उत्तरेकडे सरकवणे आणि पुलाचा गर्डर सरकवल्यानंतर सुमारे 1300 टन वजनी गर्डर साडेसात मीटर खाली आणणे हे कौशल्यपूर्ण काम आहे. पहिल्या गर्डरचे काम हे अत्यंत जोखमीचे असल्याने हे काम काळजीपूर्वक करण्याची जबाबदारी राईट्स कंपनीने घेतली आहे.

एखाद्या पुलाच्या कामात 7.5 मीटर उंचीवरून गर्डर खाली आणणे हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीच्या बाबतीत अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. रेल्वेच्या साधारणपणे एक तासाच्या ब्लॉकमध्ये गर्डर फक्त 15 सेंटीमीटर इतकाच खाली आणता येईल. त्यामुळे गोखले पुलाच्या या अवाढव्य 1300 टन वजनी गर्डरकरिता 7.5 मीटर खाली उतरवण्याच्या कामासाठी लागणारा कालावधी हा अधिक असू शकतो.

एकदा गर्डर खाली आणून स्थापन केल्यानंतर त्यावर सळ्या अंथरून सिमेंट-काँक्रिटीकरण करण्यात येईल. पुलाचे क्युरिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर मास्टिकचे काम पूर्ण करण्यात येईल. ही सर्व कामे क्रमाने झाल्यानंतरच पूल एका दिशेच्या वाहतुकीसाठी खुला करणे शक्य होईल.