MHADA Tendernama
मुंबई

Mumbai : कामाठीपुऱ्यातील रहिवाशांनी काय केली 'म्हाडा'कडे विनंती?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई सेंट्रलमधील कामाठीपुऱ्यात (Kamathipura, Mumbai Central) वर्षानुवर्षे राहणाऱ्या रहिवाशांसाठी म्हाडा (MHADA) प्राधिकरणाने पुढाकार घ्यावा, खासगी विकासकाकडून कामाठीपुऱ्याचा समूह पुनर्विकास (Redevelopment) टप्प्याटप्प्याने करावा आणि म्हाडाच्या देखरेखीखाली हा प्रकल्प राबवून रहिवाशांना डीसीआर नियमाप्रमाणे सरसकट 508 चौरस फुटांचे घर द्यावे, अशी मागणी कामाठीपुरा विकास समितीने म्हाडाकडे केली आहे.

कामाठीपुऱ्यात 16 गल्ल्या असून सध्या यातील 15 गल्ल्यांच्या परिसराचा विचार पुनर्विकासासाठी केला जात आहे. समितीच्या विकास सल्लागाराने केलेल्या मॅपिंगनुसार हा परिसर 39 एकरचा आहे. म्हाडाच्या मते हा परिसर 27 एकरचा आहे. परिसरात 100 वर्षे जुन्या 800 इमारती असून 8 हजारांहून जास्त लोकसंख्येच्या परिसरात छोटे छोटे व्यावसायिक, किराणा, नारळपाणी विक्रेते, किरकोळ व्यापारी राहतात. इमारती जुन्या झाल्या असून मोडकळीला आल्या आहेत. त्यामुळे 95 टक्के रहिवासी हे पुनर्विकासाच्या बाजूने आहेत.

दक्षिण मुंबईतील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या कामाठीपुऱ्याचा पुनर्विकास झाला तर त्यामुळे रहिवाशांना सुरक्षित घरे तर मिळतीलच, पण त्याचबरोबर उर्वरित जागेवर म्हाडाला परवडणारी घरेही उपलब्ध करून देता येणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांच्या घरांचा प्रश्नही सुटणार आहे.

कामाठीपुरा विभागाला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून केवळ काही ठराविक गल्ल्यांमध्ये वेश्याव्यवसाय चालतो म्हणून या सर्व परिसराला बदनामीचा शिक्का बसला आहे. हा शिक्का पुनर्विकासाने पुसला जाणार आहे. या परिसरात गायक प्रल्हाद शिंदे, विठ्ठल शिंदे, अभिनेते फारुख शेख, नामवंत कवी नामदेव ढसाळ, नाट्य दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे राहत होते.

पहिले साप्ताहिक काढण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पायही कामाठीपुऱ्यास लागले आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या परिसराची ओळख जपण्यासाठी आणि नवीन पिढीला ती सांगता यावी यासाठी ऐतिहासिक दालन कामाठीपुरा विकास समितीच्या वतीने उभारण्यात येईल.

कामाठीपुरा विकास समितीची सर्वसाधारण बैठक भावनाबागमधील तेलगु पद्मशाली हॉलमध्ये नुकतीच झाली. या बैठकीत कामाठीपुऱ्याच्या पुनर्विकासासाठी गेल्या 10 वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार अमीन पटेल, माजी नगरसेवक जावेद जुनेजा, दक्षिण मुंबई शिवसेना विभागप्रमुख संतोष शिंदे, समितीचे कार्याध्यक्ष सुनील कदम, म्हाडा, पालिका अधिकारी आदी उपस्थित होते. सर्व राजकीय पक्षांचा या पुनर्विकास प्रकल्पाला पाठिंबा आहे.