Mumbai Trans Harbour Link Tendernama
मुंबई

नव्या वर्षात मुंबईतून नवी मुंबईत पोहचा अवघ्या 20 मिनिटांत, कसे?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : शिवडी ते न्हावा शेवा अर्थात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) पुलाचे सुमारे ९६ टक्के बांधकाम पूर्ण झाले असून, डिसेंबरपर्यंत संपूर्ण काम पूर्ण करण्याचे उद्धिष्ट आहे. या पुलामुळे मुंबईतून नवी मुंबईत जायला केवळ २० मिनिटे लागणार आहेत. या कामावर सुमारे १८ हजार कोटींचा खर्च झाला आहे.

मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच मुंबई शहर आणि नवी मुंबई यामधील दळणवळण वाढण्याच्या दृष्टीने 2004 पासून मुंबई पारबंदर प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या मंजुरीनंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) 21.8 किमी लांबीचा सहा लेनच्या समुद्री मार्गाचे बांधकाम हाती घेतले आहे. यात 16.5 किमीचा समुद्रातून जाणारा मार्ग आणि उर्वरित 5.3 किमीचा जमिनीवरील रस्ता यातून मुंबई आणि नवी मुंबई या शहरांना जोडले जाणार आहे. हा मार्ग मध्य मुंबईत शिवडी, मुंबईच्या खाडीवर शिवाजी नगर आणि नवी मुंबईत राष्ट्रीय महामार्ग 348 वर चिरले येथे जोडला जाणार आहे. प्रकल्प प्रत्यक्षात आल्यानंतर हा सागरी सेतू भारतातील सर्वात लांब ठरणार आहे.

या पुलावरील टोल नाक्यावर 'ओपन रोड टोलिंग सिस्टीम' ही प्रणाली वापरण्यात येणार आहे. त्यामुळे टोल बुथवर थांबण्याची, रांग लावण्याची आवश्यकता वाहनचालकांना भासणार नाही. १०० किमी प्रतितास वेगाने वाहन गेले तरी टोलचे पैसे आपोआप कापले जाणार आहेत. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ या पुलाला अटल सेतू असे नाव देण्यात येणार असून या प्रकल्पासाठी एमएमआरडीएने सुमारे १८ हजार कोटी खर्च केले आहेत. या पुलामुळे थेट रायगड जिल्ह्यात पोहोचता येणार असल्याने जेएनपीटी, पुणे, अलिबाग, गोवा या ठिकाणी जाणाऱ्या वाहनचालकांची सोय होणार आहे. पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू असून डिसेंबरमध्ये ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केले जाईल, असे एमएमआरडीएचे नियोजन आहे.