Mumbai Traffic News मुंबई : मुंबईत लोकल रेल्वे मार्गावरील आणखी तीन पुलांची पुनर्बांधणी लवकरच करण्यात येणार आहे. करी रोड, माटुंगा रेल्वे हद्दीतील आणि महालक्ष्मी या पुलांच्या पुनर्बांधणीच्या प्रस्तावाला मुंबई महापालिका (BMC) आणि महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (महारेल - MHARAIL) अधिकाऱ्यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत मंजुरी दिली.
सध्या या पुलाच्या कामांचा प्राथमिक टप्प्यातील अभ्यास सध्या सुरू असून या पुलांच्या पुनर्बांधणीमुळे वाहतूककोंडी कमी होण्यासाठी मदत होणार आहे.
नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे मार्गांवरील पूल बांधणीच्या कामात महापालिका व महारेल यांच्यात समन्वय असावा, असे निर्देश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले होते. त्यानुसार ही बैठक पार पडली.
रेल्वे मार्गांवरील पुलांच्या पुनर्बांधणीचा खर्च महापालिकेकडून केला जातो, तर प्रत्यक्ष पूल उभारणी महारेलतर्फे करण्यात येत आहे. या बैठकीत रे रोड, भायखळा, दादर येथील टिळक पूल आणि घाटकोपर येथील पुलांच्या कामांचा आढावादेखील घेण्यात आला.
सध्या रे रोड पुलाचे 77 टक्के काम पूर्ण झाले असून हा पूल नोव्हेंबर 2024 पर्यंत तर भायखळा पुलाचे 42 टक्के काम पूर्ण झाले असून हा पूल ऑक्टोबर 2025 पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.
घाटकोपर पुलाचे काम 14 टक्के तर टिळक पुलाचे काम 8 टक्के पूर्ण झाले आहे. पुलांची कामे वेगाने आणि नियोजित वेळेत पूर्ण करावीत, असे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी दिले.