BMC Tendernama
मुंबई

Mumbai : मुंबईतील बच्चे कंपनीची धमाल! बीएमसी 'या' ठिकाणी उभारणार मिनी प्राणी संग्रहालय

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महानगरपालिका (BMC) नाहूर येथे अनेक प्रकारचे देशीविदेशी पक्षी, लायन, गेंडा, प्राण्यांसाठी सोयीसुविधा, पर्यटकांसाठी शॉपिंग सेंटर, कॉफी शॉप, पार्किंगची सुविधा, बच्चे कंपनीसाठी खेळण्यासाठी सोयीसुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे अशा सुविधा असणारे मिनी प्राणीसंग्रहालय उभारणार आहे. यासाठी महापालिका 50 कोटींचा खर्च करणार आहे.

नाहूर गावात नगर भूमापन क्रमांक 706 आणि 712 हे सहा हजार चौरस मीटरचे महापालिकेच्या मालकीचे भूखंड आहेत. त्यावर हे प्राणीसंग्रहालय प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी सार्वजनिक सुविधांसह पक्षीगृहाचा आराखडा व सविस्तर प्रकल्प अहवाल प्रकल्प व्यवस्थापन एच. के. डिझायनर यांनी सादर केला आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक म्हणून डॉ. भूषण गगराणी यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येईल.

प्रशासकीय मंजुरीनंतर सेंट्रल झू प्राधिकरणाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला जाईल, असे महापालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.

सेंट्रल झू प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यानंतर डिझाईन अंतिम करून टेंडर मागवण्यात येईल, असेही ते म्हणाले. पुढील दोन-अडीच वर्षांत 50 कोटी रुपये खर्च करून पूर्व उपनगरात हे प्राणी संग्रहालय पर्यटकांच्या सेवेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण आहे. या प्राणिसंग्रहालयात देशविदेशातील पशुपक्ष्यांचा किलबिलाट धमाल मस्ती अनुभवण्यासाठी दररोज 10 ते 12 हजार पर्यटक भेट देतात. येथे क्रॉक ट्रेल तयार करण्यात आले असून मगर सुसरची धमाल मस्ती अनुभवता येते.

या पक्षी संग्रहालयाचा विस्तार याच ठिकाणी केला जाणार आहे. या उद्यानाला लागूनच असलेल्या मफतलाल मिलचा सुमारे दहा एकरचा भूखंड महापालिकेला मिळाला आहे. या जागेत आधुनिक पद्धतीचे पक्षीगृह उभारण्यात येणार आहे. त्यासाठी टेंडर प्रक्रियादेखील पूर्ण करण्यात आली आहे.