Elephanta caves jetty tendernama
मुंबई

Mumbai : 'त्या' प्रसिद्ध जेट्टीचा लवकरच कायापालट! 88 कोटींतून राज्य सरकारचा 'असा' आहे प्लॅन

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई जवळील एलिफंटा जेट्टीचा (Elephanta Caves Jetty) लवकरच विस्तार करण्यात येणार आहे. या कामासाठी राज्य सरकारने सुमारे ८८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या निधीतून जेट्टीचे २३५ मीटर लांबीचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच बर्थिंग जेट्टीसाठी ८५ मीटर लांबीचा मार्ग वाढविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सागरी मंडळाने जेट्टीच्या विस्तार कामाचा प्रस्ताव सादर केला आहे. सध्या जेट्टीवर पर्यटकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. यावर तोडगा काढण्यासाठी आता जेट्टीची लांबी व रुंदी वाढविण्यात येणार आहे. पर्यटकांच्या दृष्टीने या ठिकाणी मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या विस्तार कामासाठी केंद्र शासनाकडून ५० टक्के निधी देण्यात येणार आहे, हा निधी प्राप्त झाल्यानंतर राज्य शासनाकडून निधी वितरित केला जाणार आहे.

एलिफंटा येथील शेतबंदर जेट्टीला प्रवासी चढ - उतार करण्यासाठी सहा ठिकाणी बोटी लावता येतात. गर्दीच्या वेळेस या जेट्टीस प्रवासी बोटी लावण्याकरिता जागा कमी पडत असल्याने त्यांना जेट्टीसाठीची जागा रिकामी होण्याची वाट पाहावी लागते. जेट्टीला असणाऱ्या पायऱ्या मोडकळीस आलेल्या असून जेट्टीही नादुरुस्त अवस्थेत आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशी, पर्यटक यांना अपघात होण्याची शक्यता आहे.

जेट्टीवर प्रवासी, पर्यटकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधांची कमतरता आहे. जेट्टीवरील पोचरस्त्यावर मिनी ट्रेन धावत असल्याने, रस्त्याच्या कडेला पुर्वीपासून दुकानेही असल्याने प्रवाशांना-पर्यटकांना रस्त्यावरून चालण्यास अडचण निर्माण होते.

रायगड जिल्ह्यातील एलिफंटा लेणी हे जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे स्थळ आहे. दरवर्षी जगभरातून सुमारे ८ ते १० लाख पर्यटक या ठिकाणी भेट देतात.