Mumbai Local Tendernama
मुंबई

खुशखबर! मुंबईतील 'ही' रेल्वे स्थानके होणार हायफाय; ९०० कोटींची...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : येत्या काळात मुंबई उपनगरातील लोकल रेल्वे (Mumbai Suburban Trains) स्थानकेही आता विमानतळाप्रमाणे हायफाय होणार आहेत. मुंबई उपनगरातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याची योजना मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (MRVC) आखली असून, त्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली आहे. सुमारे ९०० कोटींहून अधिक रक्कमेची टेंडर एमआरव्हीसीला प्राप्त झाली आहेत.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी काढलेल्या या टेंडरना बरा प्रतिसाद मिळाला आहे. मुंबईतील उपनगरीय स्थानकांच्या पुनर्विकासासाठी 36 महिन्यांचा कालावधी कंपन्यांना देण्यात आला आहे. आर्थिक मूल्यमापन केल्यानंतर अंतिम टेंडरची निवड होणार आहे. या स्थानकांच्या पुनर्विकासाठी टेंडर काढताना एकूण 18 स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार असून, टेंडर प्रक्रियेसाठी त्याचे एकूण सात लॉट तयार करण्यात आले आहेत. एकूण सात लॉटपैकी लॉट क्र. 2, 5 आणि 6 साठी प्रत्येकी एक टेंडर आले आहे, तर लॉट क्र. 3 साठी तीन टेंडर आली असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली आहे.

असा होणार रेल्वे स्थानकांचा पुर्नविकास -
-
प्लॅटफॉर्मच्यावर डेक उभारणार
- सर्व पादचारी पुलांना डेकचे कनेक्शन
- अतिरिक्त पादचारी पुलांची उभारणी
- नवीन फलाटांची बांधणी होणार
- जुन्या फलाटांची रुंदी व लांबी वाढणार
- सरकते जिने, लिफ्ट आणि इंडिकेटरची सज्जता

लॉटनिहाय टेंडरना मिळालेला प्रतिसाद -
1. घाटकोपर, विक्रोळी, भांडूप - 170 कोटी
2. मुलूंड, डोंबिवली - 138.6 कोटी
3. नेरळ, कसारा - 115 कोटी
4. जीटीबी, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द - 157.1 कोटी
5. मुंबई सेंट्रल, सांताक्रुझ - 104 कोटी
6. कांदिवली, मीरा रोड - 128.9 कोटी
7. भाईंदर, वसई रोड, नालासोपारा - 105.8 कोटी