Tunnel Road Tendernama
मुंबई

Mumbai : राज्यातील सर्वात लांब बोगद्याचे काम पूर्णत्वाकडे; किती वेळ वाचणार?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर उभारण्यात येत असलेल्या मिसिंग लिंकवरील बोगदा राज्यातील सर्वात लांबीचा बोगदा ठरणार आहे. समृद्धी महामार्गावर कसारा घाटातील नुकताच पूर्ण करण्यात आलेला आठ किलोमीटर लांबीचा बोगदा हा सध्या राज्यातील सर्वात लांब बोगदा आहे; मात्र पुढील काही महिन्यात मिसिंग लिंकवरील ८.९३ किमी लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण होणार असल्याने तो राज्यातील सर्वात लांब बोगदा ठरणार आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दिवस-रात्र वाहनांची मोठी वर्दळ असते. तसेच, खंडाळा घाटात नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर ठिकठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका असल्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) खंडाळा घाटात १३.३ किलोमीटर लांबीचा मिसिंग लिंक मार्ग बनविण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे मुंबई-पुणेदरम्यान प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार आहे.

या मिसिंग लिंकवर १.७५ किमी आणि ८.९३ किमीचे दोन बोगदे, केबल स्टेड पूल उभारले जाणार आहेत. केबल स्टेड पुलाचे काम सुरू असून बोगद्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या बोगद्याची लांबी जवळपास नऊ किमी असल्याने तो राज्यातील सर्वात लांबीचा बोगदा ठरणार असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

देशातील सर्वात मोठा बोगदा जम्मूत

दरम्यान, देशातील महामार्गांवरील सर्वात लांब बोगद्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर जम्मू-काश्मीरमधील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी बोगदा असून त्याची लांबी ९.२८ किमी आहे.

असा असेल बोगदा

- लांबी ः ८.९३ किमी

- रुंदी ः २१.५ मीटर

- उंची ः ११ मीटर

- चारपदरी मार्ग

- ड्रिल ॲण्ड ब्लास्ट तंत्रज्ञानाचा वापर