मुंबई (Mumbai) : मुंबईच्या गृहनिर्माण क्षेत्रात नुकताच एक मोठा व्यवहार झाला आहे. ३६० वन वित्तीय सेवा कंपनीचे संस्थापक व सीईओ करण भगत यांनी तब्बल १७० कोटीत दोन आलिशान फ्लॅट विकत घेतले आहेत. वरळी भागातील डॉ. अॅनी बेझंट रोडवर ओबेरॉय रिअॅल्टीच्या 'थ्री सिक्स्टी वेस्ट' या गृहप्रकल्पात हे फ्लॅट आहेत.
करण भगत यांनी घेतलेले दोन फ्लॅट या प्रकल्पातील इमारतीच्या अनुक्रमे ४५ आणि ४६व्या मजल्यावर आहेत. हे दोन्ही फ्लॅट सी फेसिंग असून त्यांची एकत्रित किंमत तब्बस १७० कोटी रुपये इतकी आहे. या फ्लॅटच्या नोंदणीसाठी करण भगत यांनी तब्बल ६ कोटी ४४ लाख रुपये इतके मुद्रांक शुल्क भरले आहे. ४५व्या मजल्यावरील फ्लॅटची किंमत ८५ कोटी ३० हजार इतकी आहे. या फ्लॅटचा एकूण बिल्टअप एरिया ६ हजार ४४८ चौरस फूट इतका आहे. या फ्लॅटसोबत करण भगत यांना चार कार पार्किंग मिळाले आहेत. २२ मे रोजी या फ्लॅटचा व्यवहार झाला. ४६व्या मजल्यावर खरेदी करण्यात आलेल्या फ्लॅटची किंमतही ८५ कोटी ३० हजार इतकी आहे.
या फ्लॅटचा बिल्टअप एरियाही तेवढाच असून त्यासोबतही चार कार पार्किंग मिळाले आहेत. त्यामुळे या दोन्ही फ्लॅटचे मिळून तब्बल ८ कार पार्किंग करण भगत यांना मिळाले आहेत. त्याशिवाय, दोन्ही फ्लॅटचा एकूण बिल्टअप एरिया जवळपास १२ हजार ८९६ चौरस फूट इतका आहे. मुंबईतील घरांच्या किमतींबाबत पुढे आलेल्या आकडेवारीनुसार शहरातील १ बीएचके फ्लॅटची सरासरी किंमत ६५.५ लाखांच्या घरात आहे. २ बीएचके फ्लॅटची सरासरी किंमत १.५ कोटी तर ४ बीएचके फ्लॅटची सरासरी किंमत तब्बल ९ कोटींच्या घरात आहे.