Bellasis Bridge Tendernama
मुंबई

Mumbai News : अखेर 'तो' 131 वर्षे जुना उड्डाणपूल बंद; असा बांधणार नवा पूल

टेंडरनामा ब्युरो

Mumbai News मुंबई : मुंबई सेंट्रल आणि ग्रँटरोड दरम्यानचा 131 वर्षे जुना ब्रिटिशकालीन बेलासिस उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. या पुलाच्या पाडकामाला सुरुवात करून लवकरच त्याची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. या रेल्वे उड्डाणपुलाच्या जागी केबलआधारित पूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पुढील 18 महिने हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

रेल्वे रुळांवरील वाहने आणि पादचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी 1893मध्ये बेलासिस रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात आला होता. अंधेरीतील गोखले पूल कोसळल्यानंतर मुंबईतील सर्व पुलांची संरचनात्मक तपासणी करण्यात आली. संरचनात्मक तपासणी केल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरवण्यात आला होता. त्यामुळे पुलाची पुनर्बांधणी करण्याची शिफारस करण्यात आली होती.

या रेल्वे उड्डाणपुलाच्या जागी केबलआधारित पूल उभारण्यासाठी मुंबई महापालिका, एमएमआरडीए यांनी महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट (महारेल) यांच्याशी करार केला आहे. पुलाचे रेल्वेच्या हद्दीतील काम पश्चिम रेल्वे करणार आहे, तर पुलाच्या जोडरस्त्याची उभारणी मुंबई महापालिका करणार आहे.

पूल बंद झाल्यास पश्चिमेकडून मुंबई सेंट्रल स्थानकाच्या मुख्य बुकिंग कार्यालयाशी संपर्क तुटणार आहे. बेलासिस पूल बंद केल्यास वाहनचालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्थानिक पादचारी आणि रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पुलाच्या पश्चिम दिशेला सरकते जिने असलेला पादचारी पूल उभारण्यात येणार आहे.

अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल जुलै 2018 रोजी कोसळला. त्यानंतर आयआयटी, मुंबई या संस्थेतील तज्ज्ञांमार्फत मुंबईतील सर्व पुलांची संरचनात्मक तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत मुंबई सेंट्रल-ग्रॅण्ट रोडदरम्यानचा बेलासिस पूल धोकादायक असल्याचे निदर्शनाला आले. त्यानंतर त्या पुलाची तातडीने दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार या पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच सध्या टिळक रेल्वे उड्डाणपूल, भायखळा रेल्वे उड्डाणपूल, रे रोड रेल्वे उड्डाणपूल यांची कामे सुरू आहेत. शहरातील अन्य पुलांची टप्प्याटप्प्याने पुनर्बांधणी करण्याचे महारेलचे नियोजन आहे.