BMC Tendernama
मुंबई

Mumbai : महापालिका 20 ब्लॅकस्पॉट चौकांचा करणार कायापालट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईतील वाहतूक चौक (ट्रॅफिक जंक्शन) सर्व प्रकारच्या वापरकर्त्यांसाठी सुरक्षित असावेत, यासाठी मुंबई महापालिकेने नवीन प्रकल्प हाती घेतला आहे. या माध्यमातून मुंबई महानगरातील सर्वाधिक अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) अशा २० वाहतूक चौकांचा नवीन आराखडा तयार करुन त्यानुसार त्यांचा कायापालट करण्यात येणार आहे. 

याअंतर्गत मुंबईतील सर्वाधिक अपघात प्रवण वाहतूक चौकांची पुनर्रचना करण्यात येत आहे. यामध्ये वाहतूक चौक सुरक्षित बनवताना, विशेषत: पादचारी, सायकलस्वार आणि दुचाकीस्वार यांच्यासाठी वाहतूक चौक अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेला ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी मधील भागीदारांकडून तांत्रिक सहाय्य लाभणार आहे. या भागीदारांमध्ये ग्लोबल डिझायनिंग सिटीज् इनिशिएटिव्ह (GDCI) आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (WRI) यांचा समावेश आहे.

याविषयीची प्रादेशिक बैठक नुकतीच संपन्न झाली. मुंबई महानगरपालिकेचे उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) मनीषकुमार पटेल यावेळी उपस्थित होते. बैठकीनंतर तज्ज्ञ, परदेशातून आलेल्या मान्यवरांनी मुंबईतील ५ जंक्शन्सला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. मुंबई महापालिकेने ब्लॅक स्पॉट ठिकाणी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती घेतली.

उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले या उपक्रमाची माहिती देताना म्हणाले की, मुंबई महानगरातील इतर ठिकाणांच्या तुलनेत या २० अपघात प्रवण चौकांच्या ठिकाणी अधिक अपघात होऊन पर्यायाने अधिक मृत्यू आणि जखमींची नोंद झाली आहे. त्यामुळे या चौकांचा कायापालट करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. या सर्व ठिकाणी अपघातांची संख्या कमी व्हावी, पर्यायाने नागरिकांचा वावर सुरक्षित व्हावा, या दृष्टिकोनातून सदर सर्व ठिकाणी चौकांच्या रचनेमध्ये बदल करण्यात येईल. यासाठी महापालिकेचे अभियंते हे ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी मधील भागीदारांसोबत कामकाज करत आहेत.

वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया आणि ग्लोबल डिझायनिंग सिटीज् इनिशिएटिव्ह यांनी सन २०२१-२०२२ मध्ये या अपघात प्रवण चौकांचे सर्वेक्षण केले होते आणि आता संबंधित वाहतूक चौकांच्या ठिकाणी व रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी नवीन आराखडे बनवण्यात येत आहेत. त्याद्वारे पादचारी, सायकलस्वार आणि दुचाकीस्वार या रस्ते अपघातांचा सर्वाधिक धोका असलेल्या घटकांसाठी अधिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यात येणार आहे.

वाहतूक चौकांमधील अपघात, मृत्यू आणि गंभीर दुखापतींची संख्या कमी करुन एकूणच वाहतूक चौक परिसरात सुरक्षितपणे वावरता यावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट आणि ग्लोबल डिझायनिंग सिटीज् इनिशिएटिव्ह हे वेगवेगळ्या पायाभूत सुविधा बदल समाविष्ट करणार आहेत. यामध्ये, पादचाऱ्यांना ओलांडण्यासाठी मार्गिकेचे व पदपथाचे रुंदीकरण करणे, रस्ता ओलांडण्याचे अंतर कमी करण्यासाठी नवीन आश्रय स्थाने निर्माण करणे, वाहतुकीचा वेग मर्यादीत ठेवण्यासाठी गतिरोधक व पट्ट्या यांच्यासारख्या पर्यायांचा अवलंब करणे, यांचा समावेश असणार आहे.

ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी मधील एक भागीदार असलेल्या वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडियाचे एकात्मिक परिवहन उपक्रम प्रमुख धवल अशर यासंदर्भात म्हणाले की, पादचाऱयांसाठी पुरेशा पायाभूत सुविधा पुरवल्या तर नागरिकांना रस्त्यावर चालणे, थांबणे आणि सुरक्षितपणे रस्ता ओलांडणे शक्य होते. परिणामी, वाहनांच्या थेट मार्गात पादचारी धडकण्याचे प्रमाण कमी होते. याचाच अर्थ पादचाऱयांना नजरेसमोर ठेवून आराखडे तयार केले तर १) रस्ते सर्व वापरकर्त्यांसाठी सुरक्षित होतात, २) पादचारी आणि वाहनांमधील संघर्ष घटतात, ३) वाहतूक अधिक प्रवाही व सुरळीतपणे सुरु राहते. अशाच प्रकारचा विचार करुन अमर महाल सह एकूण १२ वाहतूक चौकांच्या नवीन आराखड्यावर वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया बृहन्मुंबई महापालिकेसोबत कामकाज करत आहे.

ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी मधील आणखी एक भागीदार असलेल्या ग्लोबल डिझायनिंग सिटीज् इनिशिएटिव्हचे आशिया व आफ्रिका प्रादेशिक प्रमुख अभिमन्यू प्रकाश म्हणाले की, या अपघात प्रवण क्षेत्रांमध्ये सुधारणेसाठी सर्व शक्यतांवर आम्ही पुनर्विचार करत आहोत. त्यासाठी जागतिक रस्ते आराखडा मार्गदर्शक (ग्लोबल स्ट्रीट डिझाईन गाईड) तत्त्वांचा आधार घेत आहोत. ही मार्गदर्शक तत्वं अधिकृतपणे मुंबईने स्वीकारलेली व मुंबईसाठी असतील. पादचाऱयांना ओलांडण्यासाठी मार्गिका व पदपथ रुंदीकरण, नवीन आश्रय स्थाने, वाहतूक वेग मर्यादीत रहावा म्हणून गतिरोधक व पट्ट्या अशा वेगवेगळ्या पर्यायांचा धोरणात्मक स्वीकार केला जात आहे. तसेच, निवडक ठिकाणी रस्ते संरेखन व अरुंदीकरण केले जाईल, जेणेकरुन रहदारीचा प्रवाह सुरळीत होवून रस्ते अधिक सुरक्षित होतील. या सुधारणांसोबत, मुंबईतील रस्ते अपघात कमी करण्याच्या आमच्या दीर्घकालीन उद्धिष्टाच्या अनुषंगाने आम्ही महानगरपालिका अभियंते व मुंबई वाहतूक पोलिस विभागाला प्रशिक्षण देत आहोत, जेणेकरुन कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि शाश्वत अशा रस्ते आराखड्यांचे मूलभूत ज्ञान असावे, हे सर्व पुढाकार घेत असल्याचे अभिमन्यू प्रकाश यांनी नमूद केले.