मुंबई (Mumbai) : ऐतिहासिक अशा बाणगंगा तलाव व परिसर पुनरुज्जीवन प्रकल्प अंतर्गत कामे करताना तलावाच्या उत्तर प्रवेशद्वारावरून आतमध्ये जेसीबी उतरवून तलावांच्या पायऱ्यांची हानी केल्याबद्दल सवानी हेरिटेज कन्झर्वेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदारास मुंबई महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावत तलावास हानी पोहोचवून नुकसान केल्याबद्दल मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाणगंगा ही पुरातन वास्तू आहे. अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे तलावाच्या पायऱ्या, पायऱ्यांचे दगड, दीपस्तंभांची दुरावस्था झाली होती. तसेच तलाव परिसरात पायऱ्यांवरील बांधकामे झाली होती. महानगरपालिकेमार्फत बाणगंगा तलाव व परिसर पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प महानगरपालिकेचा विशेष प्राधान्य प्रकल्प म्हणून घोषित करुन महानगरपालिकेने त्यासाठी टेंडर प्रक्रिया राबवली. टेंडर प्रक्रियेअंती पुरातन वारसा कामे कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. पुनरुज्जीवन प्रकल्पाचा एक भाग म्हणून मुंबई महापालिकेमार्फत तलावातील सर्व बांधकाम तोडण्यात आले. तसेच दीपस्तंभांची दुरूस्ती करण्यात आली आहे. गाळ काढण्यासाठी हस्तचलित यंत्रणा उभी करण्यात येऊन गाळ काढण्यात येत होता. परंतु, कंत्राटदाराने मंगळवारी २४ जून २०२४ रोजी जेसीबी बाणगंगा तलावाच्या उत्तर दिशेच्या प्रवेशद्वाराने उतरवले. याबाबतची माहिती मिळताच डी विभागाने हे काम थांबविले. तसेच, हे जेसीबी बाहेर काढले आहे.
स्थानिक आमदार तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंगळवारी २५ जून २०२४ रोजी बाणगंगा तलाव येथे स्थळ पाहणी केली. यावेळी त्यांनी जेसीबीमुळे हानी झालेल्या पायऱ्या लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर, बाणगंगा प्रकल्पाचे कंत्राटदार सवानी हेरिटेज कन्झर्वेशन प्रायव्हेट लिमिटेड यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. तसेच, मलबार हिल पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, जेसीबीमुळे हानी पोहोचलेल्या पायऱ्या दुरुस्त करण्याची कामे तात्काळ हाती घेण्यात आली. हानी पोहोचलेल्या पायऱ्या व काढून ठेवलेले दगड यांची पुनर्स्थापना करण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून पूर्ववत स्वरूपात झाले आहे. तसेच उर्वरीत कामेदेखील यापुढच्या काळात नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार आहेत, असे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष, खासदार वर्षा गायकवाड यांनी समाज माध्यमाद्वारे व्हिडिओ पोस्ट करत खेद व्यक्त केला. याप्रकरणी ठेकेदार आणि महापालिका विरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पुनरुज्जीवन प्रकल्प अंतर्गत बाणगंगा तलाव परिसरातील ही विविध कामे घेण्यात आली आहेत.
– बाणगंगा तलावातील दगडी पायऱ्यांची सुधारणा करणे.
– बाणगंगा तलाव परिसरातील दीपस्तंभांचे पुनरुज्जीवन करणे.
– बाणगंगा तलावामध्ये आकर्षक विद्युत रोशणाई करणे.
– बाणगंगा तलावाच्या दगडी पायऱ्यांवरील अतिक्रमण हटविणे.
– रामकुंड या ऐतिहासिक व पवित्र स्थळाचे पुनरुज्जीवन करणे.
- बाणगंगा परिसरातील मंदिरांचा सर्वंकष विकास आराखडा तयार करणे व योजनाबद्ध पद्धतीने रूपरेषा ठरविणे.
- बाणगंगा तलावाकडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्यांची सुधारणा करणे.