Mumbai Municipal Corporation

 

Tendernama

मुंबई

उत्पन्न वाढीसाठी 'बीएमसी'ची भन्नाट आयडियाची कल्पना

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) आता जाहिरातीतून कमाई करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. महापालिकेचे अनेक भूखंड, इमारती मोक्याच्या ठिकाणी आहेत. तेथे जाहिरातीची परवानगी दिल्यास वर्षाला 200 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते असा महापालिकेचा अंदाज आहे. त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी टेंडर मागविण्यात येणार आहे.

महापालिकेच्या शुल्क वाढीवर मर्यादा आहेत. 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द झाल्याने वर्षाला 450 कोटींहून अधिक उत्पन्न कमी होणार आहे. कोविडमुळे अचानक अतिरिक्त खर्च वाढल्याने महापालिकेला पहिल्यांदाच ठेवी वापराव्या लागल्या आहेत. तसेच आता कोस्टल रोड सारखे मोठे प्रकल्प सुरु असून खर्चात दरवर्षी वाढ होत आहे. यामुळे महापालिका आता उत्पन्नाचे नवे मार्ग शोधत आहे. त्यात जाहिरातीतून उत्पन्न मिळवण्याचा विचार पुढे आला आहे. यासाठी महापालिका सल्लागार नेमणार असल्याचे सांगण्यात आले.

महापालिकेच्या शाळा, रुग्णालये, महापालिका कार्यालयाच्या परिसरात जाहिरात करुन महापालिका उत्पन्न मिळवणार आहे. त्यासाठी महापालिकेने प्रयत्नही सुरु केले आहेत. आतापर्यंत महापालिका खासगी ठिकाणी होर्डिंग लावण्यासाठी शुल्क वसुल करत होती. सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावण्यासाठीही शुल्क घेतले जात होते. मात्र, त्यातून फारसे उत्पन्न मिळत नव्हते. महापालिकेचे अनेक भूखंड, इमारती मोक्याच्या ठिकाणी आहेत. तेथे जाहिरात करण्याची परवानगी दिल्यास वर्षाला 200 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते असा महापालिकेचा अंदाज आहे.

महालक्ष्मी रेल्वे स्टेशन परिसर, दादर रेल्वे स्टेशन परिसर, भायखळा रेल्वे स्टेशन परिसर, वांद्रे कलानगर परिसर अशा मोक्याच्या ठिकाणी जेथे महापालिकेच्या मालकीच्या जागा आहेत, तेथे खाजगी कंपनीला जाहिरात करता येणार आहे. यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी टेंडर मागवणार असल्याचे सांगण्यात आले.