Coastal Road Tendernama
मुंबई

Mumbai: कोस्टल रोडसाठी 'इतकीच' प्रतीक्षा; बीएमसीने मनुष्यबळ वाढवले

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेमार्फत प्रियदर्शिनी पार्क ते वरळी सी-लिंकदरम्यान 10.58 किमीचा कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. हे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार होते, मात्र वरळीजवळील पुलाच्या कामातील बदलांमुळे कामाची व्याप्ती वाढल्याने हे काम जून 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्धिष्ट महापालिकेने ठेवले आहे.

सध्यस्थितीत प्रकल्पाचे 73 टक्के काम पूर्ण झाले आहे. 10.58 किमीच्या कोस्टल रोड प्रकल्पात दोन किमीचे दोन महाकाय बोगदे तयार करण्यात येत असून एका बोगद्याचे काम 10 जानेवारी 2022 ला पूर्ण झाले आहे, तर दुसऱ्या बोगद्याचे काम 90 टक्क्यांवर पूर्ण झाले असून पुढील पंधरा दिवसांत शिल्लक 150 मीटरचे काम पूर्ण होणार आहे.

कोस्टल रोडमुळे दक्षिण मुंबई वाहतूककोंडीमुक्त होणार आहे. तसेच मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि महापालिकेच्या माध्यमातून प्रियदर्शिनी पार्क ते वरळी सी-लिंकदरम्यान 10.58 किमीचा कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे 34 टक्के इंधनाची, तर 70 टक्के वेळेची बचत होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प मुंबईकरांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या रस्त्याचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार होते, मात्र वरळीजवळील पुलाच्या कामातील बदलांमुळे कामाची व्याप्ती वाढल्याने हे काम जून 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्धिष्ट महापालिकेने ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर कामगारांची संख्या वाढवण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

वरळीजवळील पुलाचे काम वगळता इतर काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. यानंतर लाईट पोल बसवणे, सीसीटीव्ही, केबल टाकणे, सिग्नल बसवणे, रंगरंगोटी, रोड मार्किंग यासाठी सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यानंतर जूनपर्यंत हा मार्ग मुंबईकरांच्या सेवेत येईल.

कोस्टल रोडमध्ये 70 हेक्टर एवढे हरित क्षेत्र उपलब्ध होणार असल्याने हा प्रकल्प पर्याकरणस्नेही ठरणार आहे. या ठिकाणी 856 वाहनांच्या पार्किंगसह प्रसाधनगृह, जॉगिंग ट्रक, सायकल ट्रक, फुलपाखरू उद्यान, सागरी पदपथ, खुले नाटय़गृह, लहान मुलांसाठीची उद्याने व खेळाची मैदाने, पोलीस चौकी, बस थांबे, रस्ता ओलांडण्यासाठी भूमिगत फुटपाथ, जेट्टी अशा नागरी सुविधा मिळणार आहेत.