Electric Vehicle Tendernama
मुंबई

मुंबईत आता 'याठिकाणी' इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : प्रदूषणमुक्त मुंबईसाठी महापालिकेने इलेक्ट्रिक वाहन धोरणाच्या परिणामकारक अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. आता शहरातील चित्रपट गृहे, पेट्रोल पंप आणि पार्किंग लॉटजवळ इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ही चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तसेच आगामी काळात महापालिकेची वॉर्ड ऑफिसं, रुग्णालये, महापालिकेच्या मालमत्तांच्या ठिकाणी सुद्धा चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत.

मुंबईला स्वच्छ-सुंदर आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिका अनेक उपक्रम राबवत आहे. यामध्ये शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून 'बेस्ट'सह महापालिका प्रशासनाकडून वापरल्या जाणाऱ्या गाड्या इलेक्ट्रिक प्रकारच्या करण्यासाठी वेगाने कार्यवाही सुरू आहे. महापालिकेच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाला वाढता प्रतिसाद पाहता आगामी काळात चार्जिंग स्टेशनची गरज लागणार असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबवून कार्यवाही केली जाईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. महापालिकेच्या 'इलेक्ट्रिक वाहन' धोरणाला मुंबईकरांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत तब्बल 9590 वाहनांची 'आरटीओ'कडे नोंदणी झाल्याची माहिती महापालिकेचे पर्यावरण उपायुक्त अतुल राव यांनी दिली.

'इलेक्ट्रिक वाहन' या धोरणात मुंबईकरांमध्ये इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. या धोरणाला चालना देण्यासाठी प्रोत्साहनपर योजना राबवण्यात येतील. मुंबईत यापुढे तयार होणाऱ्या इमारतींमध्ये चार्जिंग स्टेशन आणि या वाहनांसाठी 20 टक्के पार्किंग राखीव ठेवणे बंधनकारक असेल. तसेच आगामी काळात महापालिकेची वॉर्ड ऑफिसं, रुग्णालये, महापालिकेच्या मालमत्तांच्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येतील.